दुष्काळी परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठिशी- पालकमंत्री प्रा. शिंदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी जिल्ह्यास 684 कोटी 26 लाख रुपयांचा निधी जाहीर झाला असून त्यापैकी 140 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

जिल्ह्यातील दुष्काळी भागात चारा छावण्या सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले.

प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलीस परेड मैदानावर झाला. यानिमित्त पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी राज्य शासन नागरिकांसाठी करीत असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. खासदार दिलीप गांधी, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी प्राजित नायर, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर शानदार संचलन झाले. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी संचलनाची पाहणी केली.

त्यानंतर स्मार्ट ग्राम पुरस्कार, क्रीडा पुरस्कार आणि अहमदनगर पोलीस दलातील विशेष तपास, गुन्हे उघड अशी चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्ह्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना सर्वांनी एकत्रितपणे करण्याची गरज असल्याचे सांगून पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील 1421 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करुन तेथे दुष्काळी उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन 305 गावे आणि 1547 वाड्या-वस्त्यांना 371 टॅंकर्समार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. टंचाई निधीतून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी 8 कोटी 26 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यातील पशुधन जगवण्यासाठी जिल्ह्याबाहेर चारा विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. चारा उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना, गाळपेर योजना आणि जिल्हा वार्षिक योजनेतून मका, ज्वारी, बहुवार्षिक चारा पिकांचे बियाणे शेतकर्यांना 100 टक्के अनुदानावर वितरित केले जात आहे.

नावीन्यपूर्ण योजनेतून मूरघास निर्मितीचा आपण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची 1 हजार 639 कामे सुरु असून त्यावर 9 हजार 294 मजूर काम करीत आहे.

दुष्काळाची तीव्रता बघून जिल्हा प्रशासनाने 31 हजार 756 कामांचे शेल्फ तयार केले असून त्याची मजूर क्षमता 93 लाख 33 हजार एवढी आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 2 लाख 70 हजार 136 शेतकर्यांयना 975 कोटी 84 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.

राज्यात 50 लाख 70 हजार खातेदारांना 24 हजार 241 कोटी रकमेचा लाभ मंजूर करण्यात आल्याची माहिती प्रा. शिंदे यांनी यावेळी दिली. कापसावरील बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या 1 लाख 97 हजार 342 शेतकऱ्यांना 157 कोटी 23 लाख रुपयांची मदत दिली जाणार असून, प्राप्त 121 कोटी अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाची जिल्ह्यात चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होत असल्याचे गौरवोद्गार काढून पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी, शिधापत्रिकांचे संगणकीकरण केल्यामुळे योग्य लाभार्थ्यांपर्यंत धान्यपुरवठा करणे सुलभ झाले असल्याचे सांगितले.

आरोग्याच्या क्षेत्रातही आपल्या जिल्ह्यात चांगले काम होत आहे. राज्य तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रभावी मोहीम आपण राबवित आहोत. त्याला सर्वांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी 28 जानेवारीपासून दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान राबविणार असल्याचेही ते म्हणाले.

आदित्य धोपावकर (ज्युदो), प्रणिता सोमण (सायकलिंग). सय्यद अस्मिरोद्दिन (पैरा पावरलिफ्टिंग व एथलेटिक्स), शुभांगी रोकडे ( धनुर्विद्या क्रीडा मार्गदर्शक), शैलेश गवळी (क्रीडा कार्यकर्ता-संघटक) यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

विशेष तपास, गुन्हे उघड करणाऱ्या पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक अरुण जगताप, सुदर्शन मुंढे, संदीप मिटके, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, अभय परमार, सुनील पाटील, श्रीहरी बहिरट, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गौरवण्यात आले.

कायाकल्प अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरून महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा पुरस्कार श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. वसंतराव जमदाडे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पोलीस दलाचे शानदार संचलन, विविध विभागांच्या चित्ररथांनी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

Leave a Comment