सुजय विखेंना हरवण्यासाठी शरद पवार मैदानात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :-  सुजय विखे यांच्या विरोधात राजकीय व्यूहरचना ठरवण्यासाठी खुद्द शरद पवार सोमवारी दुपारी नगर शहरात दाखल झाले. 

जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला.विशेष म्हणजे नगरला मुक्काम ठोकत पवार यांची रात्री उशिरापर्यंत राजकीय खलबते सुरू होती. 

नगरची जागा काँग्रेसला न सोडण्याच्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहिलेल्या शरद पवार यांनी नगरच्या निवडणुकीत स्वत: लक्ष घातले आहे. 

काँग्रेसला जागा न सोडल्याने नाराज झालेले डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली. 

त्यामुळे राष्ट्रवादी विरूध्द भाजप अशी थेट लढत नगर मतदारसंघात पहायला मिळणार आहे. 

पवार यांनी विखे कुटुंबावर टीका करत कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. 

पवार  यांनी प्रत्येक तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मतदारसंघाचा आढावा घेतला. 

आवश्यक त्या सूचना करत कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. 

संग्राम जगताप यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पवार यांचा हा पहिलाच नगर दौरा आहे. विशेष म्हणजे यापूर्वी पवार नगरमध्ये क्वचितच मुक्कामी राहिले. 

या दौऱ्यात मात्र शहरात मुक्काम ठाेकत त्यांनी रात्री उशिरापर्यंत राजकीय खलबते केली. त्यांच्या या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मतदारसंघातील आढाव घेतल्यानंतर पवार यांनी सायंकाळी शहरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. 

त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पवार यांची राजकीय खलबते सुरू होती. रात्री जिल्ह्यातील काही प्रमुख राजकीय व्यक्ती त्यांच्या भेटीसाठी आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Comment