खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगमनेर : आचारसंहितेचे उल्लंघन करत विनापरवानगी सभा घेतल्याच्या कारणावरून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने युतीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली. 

अकोले विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील दत्त मंदिरामध्ये गुरुवारी सकाळी सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी तेथे सभा घेण्यात आली. या सभेत लोखंडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर टीका केली.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अप्पा केसेकर, तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांच्यासोबत शिवसेनेचे संगमनेर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी या सभेसंबंधीचे मॅसेज व्हॉटस् app वरून कार्यकर्त्यांना देण्यात आले होते.

याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यत पोहोचली. त्यांनी या सभेचे चित्रिकरण करण्याचे आदेश आपल्या पथकाला दिले होते. सभेची कोणतीच परवानगी त्यांच्याकडून घेतली गेली नव्हती.

तसेच पोलिसांकडून अशी कोणतीही परवानगी नसल्याची माहिती मिळताच लोखंडे यांच्याविरोधात भंगाचा गुन्हा नोंदवण्याचा आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री उशिराने दिले.

Leave a Comment