Ahmednagar NorthBreakingMaharashtra

विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी.

अहमदनगर :- प्रवरा साखर कारखान्यात अभियंता पदावर काम करणाऱ्या केशव कुलकर्णी यांचा संगनमत करुन खून केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. 

अभियंता केशव कुलकर्णी यांच्या मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र विखे पाटील यांच्यासह इतर तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करावा,

अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बुधवारी सुनावणी झाली.

न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांच्या समोर सुनावणी झाली असून जिल्हा व सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज सादर करावा, असे मत खंडपीठाने व्यक्त केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अभियंता केशव कुलकर्णी यांची शेतजमीन प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेजारी आहे.  

या शेत जमिनीवर विखे पाटील यांचा डोळा होता. ही जमीन विखे पाटील यांना हवी होती. त्यांनी कुलकर्णी यांना ६ एप्रिल २०१२ मध्ये कारखान्याच्या विश्रामगृहावर येण्यास सांगितले. 

त्यांना घेण्यासाठी विखे यांचे वाहनचालक राजू इनामदार गेले. कारमधून जाताना कुलकर्णी यांनी विखे पाटील शेतजमीन विकण्यासाठी दबाव आणत असल्याचे वाहनचालक राजू इनामदार यांना सांगितले.

त्यांना नकार दिला तरी ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रास देत होते.

विश्रामगृहावर बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र विखे पाटील आणि त्यांचे सुरक्षारक्षक होते. दुसऱ्या दिवशी विश्रामगृहाच्या पाठीमागे केशव कुलकर्णी यांचा मृतदेह आढळून आला. 

त्यानंतर विखे पाटील यांनी कुलकर्णी यांच्या शेतजमिनीचे खरेदीखत तयार करून विकत घेतल्याचा व्यवहार दाखवला.

कुलकर्णी यांचा कट रचून खून करण्यात आला असल्याची माहिती राजू इनामदारने मूळ तक्रारदार बापू दिघे यांना दिल्याचे याचिकेत म्हटले आहे.

केशव कुलकर्णी यांचा संगनमत करून कट रचून खून करण्यात आला असल्याची माहिती वाहनचालक राजू इनामदारने मुळ तक्रारदार बापू दिघे यांना दिली. 

ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पुराव्याची कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली.

केशव कुलकर्णी यांचे श्वविच्छेदन प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आल्यामुळे त्यांचा मृत्यू कशाप्रकारे झाला याचा अहवाल प्राप्त झालेला नाही.

राहाता तहसीलदारांकडे पंचनाम्यातील कागदपत्रांची मागणी केली, त्यावेळी त्यांनी देतो असे सांगितले. 

मात्र, काही दिवसानंतर तो अभिलेख उपलब्ध नसल्याचे सांगितल्यामुळे बापू दिघे यांनी राहता येथील तालुका न्यायालयामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असा फौजदारी संहितेनुसार अर्ज २०१६ मध्ये दाखल केला. 

या अर्जावर सुनावणी झाली असता न्यायालयाने वाहन चालक राजू इनामदार, ग्रामविकास अधिकारी कविता अहिर यांची साक्ष नोंदविली. 

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी निकाल सांगताना न्यायालयातील टंकलेखकाने जाणीवपूर्वक राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव वगळले. 

दरम्यान मुळ तक्रारदार दिघे यांनी त्या दोघांची पुन्हा साक्ष नोंदविण्यात यावी, असा अर्ज दाखल केला असता न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला. या निर्णयाच्या विरोधात दिघे यांनी २८ मार्च २०१९ रोजी खंडपीठात धाव घेतली. 

या याचिकेवर न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली असता त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज करण्यासाठी योग्य त्या मार्गाचा अवलंब करण्यात यावा, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button