Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingMaharashtra

पाचव्या आंतरराष्ट्रीय योगदिनी नगरकरांचा अभूतपूर्व उत्साह जिल्ह्यातही विविध ठिकाणी योगदिन उत्साहाने साजरा

अहमदनगर :- पाचवा आंतरराष्ट्रीय योगदिन देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नगरकरांनी आणि संपूर्ण जिल्हावासीयांनी यात सहभाग नोंदवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

जिल्हा क्रीडा संकुलातील  मुख्य कार्यक्रमाबरोबरच तालुकास्तरावरील योगदिनाचे कार्यक्रम आणि प्रत्येक शाळांमध्ये झालेल्या कार्यक्रमात 14 लाखांहून अधिक विद्यार्थी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

राज्याचे पणन व वस्त्रोद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी मुख्य कार्यक्रमात सहभाग नोंदवत उपस्थितांना प्रोत्साहन दिले. योग हा सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक असून नागरिकांना दररोज योग करावा, असे आवाहनही त्यांनी केले,

संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. राज्य शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, विविध शासकीय विभाग यांच्यासह  विविध स्वयंसेवी संस्था-संघटनांच्या सहभागातून या योगदिनाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते.

पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्यासह आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपमहापौर मालन ढोणे, माजी खासदार दिलीप गांधी, एन. एस. सुब्बाराव आदींची यावेळी उपस्थिती होती.

सकाळी सहा वाजल्यापासूनच शालेय विद्यार्थी आणि नागरिकांची पावले क्रीडा संकुलाच्या दिशेने वळू लागली होती. प्रत्येकाच्या अंगात जणू उत्साह संचारला होता.  त्या उत्साहाचे प्रतिबिंब मैदानावर पाहिला मिळाले. जवळपास २७ हजार शालेय विद्यार्थी व नागरिकांनी सामूहिक योगसाधना केली.

पालकमंत्री प्रा. शिंदे यांनीही या उत्साहाचा आवर्जून उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून योगदिवस साजरा करण्यात येऊ लागला. आज जगभरात त्याला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या सुदृढ आरोग्यासाठी योगसाधना गरजेची असून प्रत्येकाने ती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मन आणि शरीराची जोपासना करण्यासाठी योग महत्वाचा असल्याचे महापौर श्री. वाकळे यांनी केले. तर श्री. सुब्बाराव यांनी गीताच्या माध्यमातून उपस्थितांना प्रोत्साहित केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता निंबाळकर-नावंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि इतर विभागांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला. शांतीकुमारजी मेमोरियल फाऊंडेशन, भिंगार अर्बन को-ऑप बॅंक, अहमदनगर शिक्षक बॅंक, स्वानंदी हास्य क्लब, आनंद्ऋषीजी राजयोगा मेडीसेंटर, करुणा डायग्नोस्टीक्स, राज्य उत्पादन शुल्क विभाग आदींनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.

ठीक सव्वा सात वाजता या सामूहिक योगसाधनेस सुरुवात झाली. महावीरनगर मल्लखांब व योगा ट्रेनिंग सेंटरच्या प्रणिता तरोटे, जिल्हा योग संघटनेचे उमेश झोटिंग, इंडियन नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनच्या प्रेरणा नांबरिया, श्रीनिवास नांबरिया, पतंजलीचे अविनाश ठोकळ, मनीषा लोखंडे, अंजली गांधी आणि आर्ट ऑफ लिव्हींगचे महेंद्र शिंदे या योगशिक्षकांनी उपस्थितांकडून योग प्रात्यक्षिके करुन घेतली.

जिल्हाभरामध्ये विविध शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, एन. एस. एस., एन. सी. सी.,स्काऊट, गाईड, तांत्रिक शैक्षणिक संस्था, नर्सिंग कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांनी त्यांच्या त्यांच्या आस्थापनांमध्ये सहभाग नोंदवला. शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे आणि त्यांच्या  त्यांच्या सहकार्‍यांनी यासाठी नियोजन केले.

जिल्हास्तरावर झालेल्या या उपक्रमात विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी -कर्मचारी तसेच शहरी शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, शासकीय तंत्रनिकेतन, मनपा शिक्षण मंडळ, नेहरू युवा केंद्र, जिल्हा योग संघटना, अहमदनगर एज्युकेशन सोसायटी, 

एम. एम. वाय. टी. सी.,जिजाऊ हास्य क्लब, जिल्हा मैदानी खेळ संघटना ,रोटरी क्लब, लायन्स क्लब, मॅक्सीमस स्पोर्टसक्लब, योगा टीचर, आर्ट ऑफ लिव्हींग आदि संस्थांचे अधिकारी , पदाधिकारी तसेच कर्मचारी,  खेळाडू, कलाकार,  सामाजिक,  सांस्कृतिक, आर्थिक,  राजकीय, औद्योगिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.

सुमारे चाळीस मिनिटांच्या सामूहिक योग कार्यक्रमामध्ये प्रार्थना, पूरक हालचाली ,विविध आसने, प्राणायाम, ध्यानधारणा व ओंकार,संकल्प आणि प्रार्थना आदी कृती कार्यक्रम योगशिक्षकांनी करुन दाखवले.  

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या संकल्पनेतून क्रीडासंकुलावर उभारलेल्या सेल्फी पॉईंटलाही योगसाधकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र तेथे पाहिला मिळाले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button