Blog : डॉक्टर व माणूस म्हणूनही कसोटी पाहणारा ….‘तो’ एक क्षण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एक डॉक्टर काम करताना हॉस्पिटलमध्ये ओपीडीत रूग्णांची गर्दी, ऍडमिट असलेल्या पेशंटची तपासणी, नियोजित ऑपरेशन असा धावपळीचा व व्यस्त दिवस कसा संपतो हे कळत नाही.

असेच नेहमीच्या दिनक्रमाप्रमाणे काम चालू असताना सायंकाळच्या सुमारास एक अत्यवस्थ महिलेला घेवून तिची नातेवाईक महिला हॉस्पिटलमध्ये आली.

तिची अवस्था खूपच नाजूक दिसत असल्याने माझ्या नर्सिंग टिमने मला तातडीचा कॉल देवून बोलावून घेतले.

पंचविशीच्या आसपास असलेल्या त्या महिलेची शुध्द जवळपास हरपत चालली होती, पोटात होणार्‍या वेदना सहन करण्यापलिकडे पोहचल्याने ती अर्धवट ग्लानीतच होती.

मी तातडीने तपासणी सुरु केली. तिचा बी.पी.ही लागत नव्हता. तपासणी केली असता तिच्या गर्भात रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले. रक्तस्त्राव खूप असल्याने तिची प्रकृती वेगाने खालावत होती.

अक्षरश: जीवनमरणाच्या सीमारेषेवर मृत्युशी झगडत असताना तिला दुसरीकडे पाठवणे शक्यही नव्हते. तात्काळ ऑपरेशन करण्याची गरज होती.

Photo – Dr Amol Jadhav

त्यातही खुप मोठा धोका होताच. अत्यवस्थ महिलेबरोबरच पुरुष नातेवाईकही नव्हता, एक महिलाच सोबत होती. त्यांच्याकडे पैसेही नव्हते. अशी सर्व कसोटी पाहणारी परिस्थिती कशी हाताळायची असा प्रश्न मनात आला?

वेळ अजिबातच नसल्याने काही क्षण डोळे मिटले आणि निर्णय घेतला सदर महिलेचे ऑपरेशन करायचे. लगेचच तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्यास सांगून तयारी केली.

मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला असल्याने तिचा ब्लड ग्रुप तपासून रक्त पिशव्यांची इमर्जन्सी व्यवस्था होईल हे स्वत: पाहिले. रक्त देवून तसेच आवश्यक रक्तघटकांची इंजेक्शन देवून तिचा बी.पी.स्थिर केला.

तिला भूल सहन होईल अशा स्टेजवर आणले. यानंतर आवश्यक ती शस्त्रक्रिया केली. वैद्यकी शिक्षण व संपूर्ण अनुभव पणाला लावून महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केली.

यातून तिला जीवदान मिळाले. काही वेळाने तिचे जवळचे नातेवाईक रूग्णालयात आले. त्यांना संपूर्ण घटनाक्रम कथन केला. त्यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले.

नातेवाईकांनी ऋण व्यक्त करताना माझे पाय धरण्याचा प्रयत्न केला. त्यांना थोपवून रूग्ण महिलेच्या प्रकृतीची सविस्तर माहिती दिली.

आमच्या स्टाफला ऑपरेशननंतर घ्यावयाची काळजी याबाबत सूचना केल्या व एका वेगळ्याच समाधानात केबिनमध्ये येवून बसलो.

अक्षरश: क्षणाचा विचार करून घेतलेला निर्णय आणि एक तासात घडलेला हा संपूर्ण घटनाक्रम मन:पटलावर एखाद्या सिनेमाप्रमाणे रिवाइंड झाला.

अत्यवस्थ रूग्ण व त्याला वाचवण्यासाठी वैद्यकीय कौशल्य पणाला लावत डॉक्टरांची सुरु असलेली धडपड रूग्णालयाशी संबंधित असलेल्यांना नवी नसेल.

परंतु, या आव्हानात्मक परिस्थितीत डॉक्टरांची मनस्थिती खूप वेगळी असते. माझ्याकडे आलेली हि महिला रूग्ण तशी परगावची होती.

तिचे घर व माझे हॉस्पिटल या अंतरामध्ये कितीतरी हॉस्पिटल असतील. परंतु, ती पहिल्याच वेळी अशा अवस्थेत माझ्या हॉस्पिटलमध्ये आली.

कुठल्या तरी अज्ञात शक्तीनेच तिला आमच्या हॉस्पिटलमध्ये पाठवले असेल, कारण याआधी ती हॉस्पिटलमध्ये कधीच आलेली नव्हती.

Photo/ Saraswati Hospital

कंठाशी आलेला तिचा प्राण वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले हे माझ्यासाठी खुप समाधान देणारे आहे. 

यानिमित्त आजच्या काळातील डॉक्टर-रूग्ण संबंधावरही भाष्य करणे औचित्याचे ठरेल. विशेषत: अत्यवस्थ असलेल्या रूग्णाला हॉस्पिटलमध्ये आणल्यावर डॉक्टरांना त्यांच्या निर्णय प्रक्रियेत सहकार्य करणे, त्यांच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक असते, असे मला वाटते.

शेवटी डॉक्टर हाही एक माणूसच असतो. आपल्या ज्ञान व अनुभवानुसार तो रूग्णावर उपचार करीत असतो. त्याचे अंतिम ध्येय हे व्याधीमुक्त रूग्ण हेच असते.

यासाठी डॉक्टर 100 टक्क्यांपेक्षा जास्तच प्रयत्न करीत असतात. अशावेळी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना त्यांचे ध्येय पूर्ण होण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका रूग्णाचे नातेवाईक घेवू शकतात.

माझ्यासाठी हा अनुभव व तो एक तास आयुष्यभर लक्षात राहिल असाच ठरला. डॉक्टर व माणूस म्हणूनही कसोटी पाहणार्‍या या आव्हानात्मक परिस्थितीत यशस्वी ठरलो याचे मिळणारे समाधान माझ्यासाठी कायम लाखमोलाचे राहिल.

डॉ.अमोल जाधव, स्त्रीरोग तज्ज्ञ
सरस्वती हॉस्पिटल, अहमदनगर

Leave a Comment