Ahmednagar NewsAhmednagar SouthBreaking

नोकरीत फसवणूक झाल्याने युवकाची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या

राहुरी :- देवळाली प्रवरा येथील युवकाचा मृतदेह शुक्रवारी पाचोरा येथे रेल्वे रुळावर आढळला. आदिनाथ भिंगारे (२१) असे या युवकाचे नाव आहे. 

त्याच्याजवळील ओळखपत्रामुळे रेल्वे पोलिसांना ओळख पटली. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याने आदिनाथने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

कारवस्ती येथील गरीब कुटुंबातील अत्यंत हुशार असलेल्या आदिनाथने आत्महत्या केल्याचे समजताच गावावर शोककळा पसरली. 

राहुरी फॅक्टरी येथील धनलक्ष्मी लॉजमध्ये १५ दिवसांपूर्वी तो कामाला लागला होता. जळगाव एमआयडीसीत डीटीपी ऑपरेटरची नोकरी देतो, असे सांगून देवळाली प्रवरा येथील एक युवक त्याला घेऊन गेला. 

नोकरीला लावण्यासाठी त्याच्याकडून १५००० रुपये घेतले. मात्र, तेथे गेल्यावर काहीतरी प्रॉडक्ट विकायचे आणि मेंबर जोडायचे, असे सांगून त्याला वेगळेच काम दिले गेले. 

फसवणूक झाल्याचे लक्षात आले तेव्हा आदिनाथने आपल्या गावातील आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढूस यांना दूरध्वनी करून सांगितले की, माझी बॅग, पैसे, चप्पल सर्व काही येथील लोकांनी काढून घेतले आहे.

मला ते बाहेर जाऊ देत नव्हते. मी त्यांच्या तावडीतून पळून आलो आहे. मी सध्या जळगाव एमआयडीसीत आहे. कृपया मला वाचवा.

ढूस यांनी लगेच देवळालीतून आदिनाथला घेऊन गेलेल्या मित्राशी संपर्क साधला. आदिनाथला फसवू नका, त्याचे पैसे लगेच परत देऊन त्याला गावी पाठवून द्या, असे त्यांनी सांगितले.

आदिनाथला धीर देत जसा असेल तसा देवळालीला निघून ये, असे ढूस यांनी सांगितले, पण त्याच्याकडे परत येण्यासाठी पैसे नव्हते. ढूस यांनी जळगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्याशी संपर्क साधला.

शिरसाठ यांनी तत्काळ संबंधितांना पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली. आदिनाथचे म्हणणे होते की, मला नोकरीचे आमिष दाखवून फसवून जबरदस्तीने पैसे काढून मला डांबून ठेवले.

पण त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. केस काढून घे, नाही तर तुला आम्ही जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी कंपनीचे लोक त्याला देत होते.

दुसऱ्या दिवशी कंपनीच्या लोकांनी आदिनाथकडून काही कागदांवर जबरदस्तीने सह्या करून घेतल्या. ढूस यांनी ही बाब नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या सचिवांच्या निदर्शनास आणून दिली.

त्यांनी लगेच पोलिस निरीक्षकाशी दूरध्वनीवरून चर्चा करून सहकार्य करण्यास सांगितले. मात्र, नंतर दोन दिवस आदिनाथचा संपर्क होऊ शकला नाही. शुक्रवारी रेल्वेरुळावर त्याचा मृतदेह आढळला.

लगेच पोलिस निरीक्षकाशी दूरध्वनीवरून चर्चा करून सहकार्य करण्यास सांगितले. मात्र, नंतर दोन दिवस आदिनाथचा संपर्क होऊ शकला नाही. शुक्रवारी रेल्वेरुळावर त्याचा मृतदेह आढळला.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button