Ahmednagar NorthBreakingMaharashtra

निळवंडे ओव्हरफ्लो…अनेक गावांचा संपर्क तुटला, पूल पाण्याखाली

अकोले :- मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुका जलमय झाला असून सर्वदूरच्या पावसामुळे तालुक्‍यामध्ये जनजीवन गारठले आहे. जनसंपर्क तुटलेला, वाहतूक विस्कळीत झालेली आणि घराच्या बाहेर पडण्यास धजावणारे कमी अशी स्थिती राहिली आहे.

त्यातच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांबरोबरच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याने सर्वच माहोल थंड राहिला. संथ गतीने का होईना, पण राज्य परिवहन महामंडळ बससेवा मात्र विना व्ययत्य सुरू राहिली.

भोजापूर’ (दि. 2) नंतर “भंडारदरा’ (दि. 3) नंतर “आढळा’ (दि. 4) व आज “निळवंडे’ अशी सलग चार दिवस धरणे भरल्याने सकाळी धरण सुरक्षितेसाठी निळवंडेतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

काल भंडारदरा धरणातून विसर्ग सोडण्यात टप्प्याटप्प्याने वाढ केली गेली. तर प्रवराबरोबरच मुळा, आढळा आणि म्हाळुंगी या नद्या पुरामुळे दुथडी भरून वाहत होत्या. त्यामुळे धरणे, नद्या, नाले, ओढे यांचे सर्वदूर जनजीवनावर साम्राज्य राहिले.

कच नदीला पूर आल्याने जायकवाडी, पवारवाडी व अन्य छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत, अशी माहिती संजय उकिरडे यांनी दिली. त्यामुळे बेलापूर गावाचा संपर्क तुटला गेला होता. नंतर तो पूर्वपदावर आला आहे. मुळा नदीचा पूर आज उतरू लागला आहे.

पण कोतूळ येथील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. येथील मंदिराचा कळस फक्त दिसतो आहे. रस्ते पाण्याने भरलेले आणि भोळेवाडीचा पूल पाण्याखाली गेल्याने व त्याच मार्गावरील पिसेवाडी पूलही पाण्याखाली गेल्याने कोतूळ-ब्राह्मणवाडा अशी ट्रॅफिकची कोंडी झालेली होती.

मुळा नदीला आलेल्या पुरामुळे कोतूळ गावाची स्मशान भूमीही पाण्याखाली गेल्याने आज या गावातील एक दशक्रिया विधी बाजूला करावा लागला असल्याची माहिती प्रदीप भाटे यांनी दिली.

प्रवरा नदीला पूर आल्याने निंब्रळ येथील पूल, इंदोरी – मेहेंदुरी येथील जुना पूल, अकोले येथील अगस्ती आश्रमाकडे जाणारा पूल व कळस येथील जुना पूल पाण्याखाली गेले आहेत. आज प्रवरा खोऱ्यात जी स्थिती तीच मुळा खोऱ्यात आणि तीच आढळा खोऱ्यात राहिली.

आढळा बरोबरच म्हाळुंगी खोऱ्यातही वेगळी स्थिती नव्हती. आढळा खोऱ्यातील टाहाकारी, समशेरपूर व सावरगाव पाट येथील पूल पाण्याखाली गेले आहेत.

पाणीपातळी जास्त वाढल्याने या पुलाच्या वर पाणी असल्याने या गावांचा संपर्क इतर गावांशी तुटला आहे. तालुक्‍याशीही तुटला आहे, असे कैलास जाधव यांनी सांगितले. आज सर्व तालुका जलमय बनलेला होता.

सकाळी भंडारदरा धरणामध्ये दहा हजार 507 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. घाटघर, रतनवाडी येथे अतिवृष्टी झाल्याने धरणात येणारे अधिकचे पाणी स्पिलवे वाटे, टनेल व व्हाल्व्ह वाटे असे एकूण 10 हजार 999 क्‍युसेकचा विसर्ग प्रवरा नदी पात्रात सोडला जात होता.

त्यात वाकी बंधारा व कृष्णावंतीचा दोन हजार 199 मिळाल्याने तब्बल तेरा हजाराचा इतका विसर्ग निळवंडे धरणात जमा होऊ लागला. त्यामुळे या धरणातील पाण्याची वाढती आवक ध्यानात घेऊन या धरणातील पाणी विसर्ग केवळ धरणाची सुरक्षितता म्हणून पाणी प्रवरा पात्रात सोडले जात आहे, असे या धरणाचे शाखा अभियंता मनोज डोके यांनी सांगितले.

निळवंडे धरणाच्या सांडव्यावरून सकाळी 11 हजार 64 आणि 750 इतका एकूण अकरा हजार 814 विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडला जातो आहे. त्यामुळे या नदीला पूर आलेला आहे.

दुपारी त्यात वाढ करून दोन वाजेच्या नंतर हा विसर्ग 14 हजार क्‍युसेकपर्यंत वाढविण्यात आला असेही त्यांनी सांगितले. निळवंडे धरणाची साठवण क्षमता 8 हजार 320 दशलक्ष घनफूट इतकी आहे.

या धरणाच्या साठ्यामध्ये सकाळी 7 हजार दशलक्ष घनफूट असणारा साठा दुपारी साडेसात हजार दशलक्ष घनफूट इतका बनला होता. 7 हजार 700 दशलक्ष घनफूट धरणाचा साठा झाल्यावर हे धरण तांत्रिकदृष्ट्‌या भरण्याचे घोषित केले जाते. 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button