Maharashtra

भुजबळ पती-पत्नीसह संबंधीत अधिकार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर :- जिल्हा रुग्णालयातील क्षयरोग केंद्रात नेमणुकीस असलेले भुजबळ पती-पत्नी विरोधात सरकारची फसवणुक करुन अपहार केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना मोकळीक देणार्‍या संबंधीत अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीच्या दक्षिण जिल्हा संघटक स्मिता आष्टेकर यांनी केली.

या मागणीचे निवेदन जि.प. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांना देण्यात आले असून, याची प्रत सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीपकुमार व्यास यांना पाठविण्यात आली आहे. यावेळी कमल जाधव, मंदा होडगे, कल्पना गुंजाळ उपस्थित होत्या.

जिल्हा रुग्णालयातील क्षयरोग केंद्रात मंगल हजारे-भुजबळ सन 2013 पासून कार्यरत आहेत. त्यांच्यावर नगर तालुक्यातील 7 आरोग्य केंद्रासह त्यांच्या अखत्यारीतील उपकेंद्रांना भेट देऊन दिलेल्या कामाची पुर्तता करणे आवश्यक आहे. त्या या आरोग्य केंद्रात अजिबात फिरकत नाही.

भुजबळ यांची नेमणुक नगर तालुका आरोग्य अधिकार्‍याच्या कक्षेत असताना जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुनिल पोटे यांनी त्यांना आपल्या कार्यालयात रुजू करुन घेतले. तेथे त्यांच्यावर कोणत्याही कामाची जबाबदारी नसून, त्यांचा दैनंदिन कामाचा तपशील देखील या विभागाकडे उपलब्ध नाही.

शासकीय नोकरदारांना राजकीय पक्ष, अथवा संघटनेत सहभागी होण्याची मुभा नाही. मात्र मंगल भुजबळ यांनी सर्व नियम पायदळी तुडवून नुकतेच झालेल्या महापालिका निवडणुकीत नगरसेवकाच्या उमेदवारीसाठी भाजप पदाधिकार्‍यांना मुलाखती दिल्या.

तर खा.सुजय विखे यांच्यासह मुंबईत झालेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्याच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्या. यावरुन शासकीय नोकरीत असताना ते राजकीय पक्षात सक्रीय असल्याचे सिध्द होत आहे. सरकारी नोकरीत असताना राजकीय नेत्यांच्या नावाचा गैरवापर करुन दशहत निर्माण करण्याचा सपाटा भुजबळ यांनी चालविला असल्याचा आरोप स्मिता आष्टेकर यांनी केला आहे.

नुकतेच मंगल भुजबळ यांनी आपले पती विलास भुजबळसह राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्‍यास घरात घुसून मारहाण केली. या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. यानंतर देखील क्षयरोग विभागाचे अधिकारी डॉ.सुनिल पोटे व डॉ.संदिप सांगळे यांनी त्यांना जाब न विचारता त्यांची पाठराखण केली. यावरुन या विभागात अनागोंदी कारभार चालू असल्याचे स्पष्ट होत आहे.

मंगल भुजबळ यांनी सन 2014 मध्ये महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणुक लढवली आहे. तर 2018 मध्ये देखील प्रभाग क्र.15 मधून निवडणुक लढवली. राजकीय पक्ष व निवडणुकीत सक्रीय सहभाग घेऊन निवडणुक काळात हजर नसताना देखील डॉ.पोटे व डॉ.सांगळे यांच्या कृपेने भुजबळ यांना वेतन अदा करण्यात आलेले आहे.

तर निवडणुकीत नामनिर्देशनपत्रात देखील त्या सरकारी नोकरीवर असल्याचीबाब लपविण्यात आली आहे. निवडणुक काळात प्रचारात असताना डॉ.पोटे व डॉ.सांगळे यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करुन शासनाची फसवणुक करीत भुजबळ यांना वेतन अदा करीत अपहार केल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

याप्रकरणी सखोल चौकशी करुन मंगल हजारे भुजबळ, विलास भुजबळ व त्यांना पाठिशी घालणार्‍या संबंधीत क्षयरोग विभागातील अधिकार्‍यांवर सरकारची फसवणुक व अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button