निलक्रांती चौकच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांनी अधिकार्‍यांना धरले धारेवर

अहमदनगर – दिल्लीगेट परिसरातील निलक्रांती चौक येथे रखडलेल्या गटारीच्या कामामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी दि.9 ऑगस्ट रोजी ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना धारेवर धरत जाब विचारला.

अडचणी दूर करुन कामाला तात्काळ गती न दिल्यास रास्तारोको आंदोलन सुरू करण्याचा इशारा माजी नगरसेवक अ‍ॅड.धनंजय जाधव व उपस्थित नागरिकांनी दिल्यानंतर रखडलेले काम वेगाने सुरू करण्यात आले. यावेळी जाधव यांच्यासह नागरिक व पीडब्ल्युडीच्या अधिकार्‍यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. 

शासनाच्या निधीतून सुरू असलेल्या गटारीच्या कामात अनेक अडथळे येत असल्याने काम संथगतीने सुरू होते. परिणामी, वाहतूक कोंडीसह परिसरातील गाळेधारकांच्या व्यवसायावरही याचा गंभीर परिणाम झाला. माजी नगरसेवक जाधव यांनी सार्वजनिक व मनपा अधिकार्‍यांकडे सातत्याने पाठपुरावा करुन काम मार्गी लावण्याची मागणी केली.

AMC Advt

मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. अखेर जाधव यांच्यासह तेथील रहिवासी व गाळेधारकांनी सार्वजनिक बांधकाम व मनपा अधिकार्‍यांशी संपर्क साधून तात्काळ कामाला गती न दिल्यास रास्तारोको आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला.

त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राजभोज, मनपाचे अभियंता श्रीकांत निंबाळकर यांनी कामाच्या ठिकाणी येवून जाधव यांच्यासह नागरिकांशी चर्चा केली. संतप्त नागरिकांनी यावेळी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकार्‍यांशी बाचाबाचीही झाली.

त्यानंतर सुमारे तासभर चर्चा होऊन कामात असलेला अडथळा दूर करुन कामाला सुरूवात करण्यात आली. पुन्हा काम रखडल्यास अथवा बंद पडल्यास कोणतीही सूचना न देता आक्रमक आंदोलन सुरू केले जाईल, असे जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान जलवाहिन्यांचा अडथळा दूर करण्यासाठी काही खर्च मनपाने स्वतः करुन एका बाजूचे काम मार्गी लावले. मात्र सिध्दीबागेच्या प्रवेशद्वारासमोरील बाजूपासून लॉ कॉलेजच्या दिशेने गटारीचे काम करतांना पाईप टाकण्यापूर्वी पीसीसी करण्याची तरतूद अंदाजपत्रकात आहे.

त्यासाठी मनपाने गटारीचा प्रवाह इतर दिशेने बदलून द्यावा व त्यानंतर काम सुरू करावे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे होते. प्रत्यक्षात हे शक्य नसल्याचे ठेकेदार व मनपा अधिकार्‍यांकडून सांगितले जात होते. त्यामुळे तिढा निर्माण झाला होता.

तसेच अंदाजपत्रकात नमूद असलेल्या पाईपपेक्षा जास्त क्षमतेचे पाईप वापरले जात असल्याने पीसीसी करण्याची गरज नसल्याचे व काळी माती, गाळामुळे पीसीसी टिकणार नाही, असे ठेकेदाराचे म्हणणे होते. याबाबत निर्णय होत नसल्याने काम रखडले होते. अखेर गटारीतील पाण्याचा प्रवाह टप्प्याटप्प्याने थांबवून पीसीसी करावे व त्यावर पाईप टाकण्याचा निर्णय झाला व कामाला सुरूवात झाली.