वॉटर कप स्पर्धेत सोनेवाडी प्रथम

नगर : पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यावर्षी नगर तालुक्यातील सोनेवाडी (चास), जांब व सारोळा कासार या गावांनी बाजी मारली.

सोनेवाडीला तालुक्यात प्रथम (१० लाख रुपये), जांब द्वितीय (६ लाख रुपये) तर सारोळा कासारला तृतीय (४ लाख रुपये) क्रमांकाचे बक्षीस मिळाले. 

यावर्षी ८ एप्रिल ते २७ मे अशी ५० दिवस ही स्पर्धा पार पडली. नगर तालुक्यात स्पर्धेसाठी ५२ गावांनी प्रशिक्षण घेतले होते. यातील अवघ्या १० ते १२ गावांनी तालुक्यात काम करून आपले गाव पाणीदार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

AMC Advt

तसेच स्पर्धेचे पारितोषिक मिळविण्यासाठी अत्यंत चुरस निर्माण झाली होती. यामध्ये आज पुणे येथे पाणी फौंडेशनने आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात तालुक्यात बाजी मारणाऱ्या गावांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सोनेवाडी (चास) गावाने प्रथम क्रमांक मिळविला.

या गावाला पाणी फाउंडेशन कडून १० लाखांचे बक्षीस मिळाले. तालुक्यात द्वितीय क्रमांक जांब या गावाने तर तृतीय क्रमांक सारोळा कासार या गावाने मिळविला. जांब गावाला ६ लाख रुपये, सारोळा कासार गावास ४ लाख रुपये शासनातर्फे दिले जाणार आहे.

सोनेवाडी गावामध्ये जलसंधारण, माती परीक्षण, वृक्षारोपण, सेंद्रिय खत निर्मिती, शोषखड्डे, रोपवाटिका आदी कामे श्रमदानामधून तसेच यंत्र सामुग्रीमधून करण्यात आले. सर्व परीक्षणाअंती हा पुरस्कार गावास मिळाला.

यामध्ये ज्येष्ठ नेते ज्ञानदेव दळवी, दिलीप सुंबे, मच्छिन्द्रनाथ येणारे, नंदू दळवी, नितीन दळवी, अतुल सुंबे, विकास गोबरे, संपत दळवी, गणेश देशमुख, दीपक बोरगे, गणेश काळे, विजय काळे, राजेंद्र वारे, अर्जुन वारे, समस्त ग्रामपंचायत सदस्य आदींसह समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

 पाणी हे जीवन असून पाणी संवर्धन काळाची गरज आहे. याच अनुशंघाने गावपातळीवर नियोजन केले. सर्व ग्रामस्थांनी यामध्ये योगदान दिले. हे मिळालेले बक्षीस म्हणजे गावकऱ्यांच्या एकीचा सन्मान आहे. समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
                                        – ज्ञानदेव दळवी, ज्येष्ठ नेते, सोनेवाडी