Ahmednagar NewsAhmednagar NorthBreaking

सोनई पोलिसांना सापडेनात खुनाचा प्रयत्न करणारे हल्लेखोर

नगर –
नेवासा तालुक्यातील सोनई येथे अमोल राजेंद्र शेजवळ या युवकावर प्राणघातक हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी सोनई पोलिसांना शोध घेऊनही सापडेनात. या हल्ल्यात अमोल शेजवळ गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गुन्ह्यातील एक आरोपी स्वतःहून पोलिसांपुढे हजर झालेला असून इतर हल्लेखोर मात्र फरार आहेत. 

शुक्रवार दि. ९ ऑगस्ट रोजी सोनई येथील हलवाई गल्लीमध्ये लहू धनवटे, सागर कुसळकर उर्फ सावकार, सुरज कुसळकर, आन्नू कुसळकर व इतर युवकांनी अमोल शेजवळ याच्यावर सशस्त्र हल्ला केला. तू भांडण का सोडवले, तु खूप मोठा भाई झाला का ? असे म्हणून त्यांनी अमोलच्या डोक्याला गावठी कट्टा लावून तलवार चॉपरने त्याच्या गळ्यावर  आणि पाठीवर वार केले. तसेच त्याला दगडाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात अमोल शेजवळ, अजय फुलमाळी, गौतम आंभोरे व अशोक फुलमाळी हेही जखमी झाले आहेत. 

जखमी अवस्थेत अमोल याला नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सोनई पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला. त्यानुसार सागर कुसळकर, सुरज कुसळकर, लहू धनवटे, आन्नू कुसळकर यांच्यासह इतरांविरुद्ध सोनई पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करणे, शिवीगाळ दमदाटी करून मारहाण करणे, यांसह आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केलेला आहे. 


या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी सागर कुसळकर हा स्वतःहून सोनई पोलिसांना शरण आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मात्र इतर आरोपी फरार झाले असून त्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे. दरम्यान या गुन्ह्यातील एक संशयित आरोपी पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन पुन्हा पसार झाल्याची चर्चा आहे. 

दुसर्‍या गटाचीही फिर्याद

अमोल शेजवळ याच्यावर हल्ला होण्यापूर्वी सोनई येथील हॉटेल विश्वजीतमध्ये दोन गटात वाद झाले होते. यावेळी बाचाबाची व हमरीतुमरीही झाली. याप्रकरणी सागर कुसळकर याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अमोल शेजवळ, अजय फुलमाळी, अशोक फुलमाळी व सोन्या अंभोरे यांच्याविरुद्ध मारहाण करणे, शिवीगाळ दमदाटी करणे व आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंदवला आहे. 

चौकट – सोनईत दहशतीचे वातावरण

शुक्रवारी रात्री झालेल्या या हल्ल्यानंतर आरोपी फरार झालेले आहेत. त्यामुळे सोनईत अजूनही प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांना आरोपी सापडत नसल्यामुळे हलवाई गल्लीत राहणाऱ्या महिला प्रचंड घाबरलेल्या आहेत.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button