Ahmednagar NorthBreakingMaharashtra

कुत्र्यांच्या त्रासापासून सुटकेसाठी घरासमोर कुंकवाचे पाणी!

श्रीरामपूर : शहरासह ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा रात्री-बेरात्री सुरू असलेला उपद्रव तसेच अंगणातील विष्ठेला वैतागलेल्या नागरिकांकडून नामी शक्कल लढविण्यात आली आहे.

कुत्र्यांना हुसकावून लावण्यासाठी कुंकवाचे पाणी भरलेल्या लाल भडक रंगाच्या बाटल्या घरासमोर नजरेस पडू लागल्या आहेत. या उपायातून काही प्रमाणात मोकाट कुत्र्यांच्या त्रासापासून दिलासा मिळाल्याचा दावाही नागरिकांकडून केला जात आहे.

गल्लीबोळातील कुत्र्यांना वैतागलेल्या नागरिकांनी त्यांना हुसकावून लावण्यासाठी मिनरल वॉटरच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये पाणी घेऊन त्यात कुंकू मिसळल्यानंतर ही लाल रंगाची बाटली घराच्या फाटकाजवळ आणि कंपाऊंडला लावलेल्या ठिकठिकाणी नजरेस पडत आहेत.

या बाटल्या घराजवळील पटांगणात आणि झाडालगत कुत्र्यांनी घाण करू नये म्हणून ठेवण्यात आल्यानंतर कुत्री भटकत नसल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांकडून हा प्रयोग राबविला जात आहे.

यामुळे शहरासह बेलापूर गावातील बहुसंख्य घराबाहेरील अंगणात, कंपाऊंड व फाटकाला या लाल बाटल्या लावलेल्या दिसून येत आहेत. घराजवळ वाळूचा गंज पडला असेल तर मोकाट कुत्र्यांचा वावर अधिक असतो. याठिकाणी कुत्रे घाणही करतात. अशात वाळूच्या गंजावर या बाटल्या दर्शनी बाजूस रोवल्याचेही चित्र आहे. .

कुंकू आणि पाण्याच्या मिश्रणाच्या नामी शक्कलमागे अंधश्रद्धा किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन नसला तरी लाल भडक रंगाच्या पाण्याच्या बाटल्या पाहून कुत्रे दचकतात. नवीन काहीतरी दिसतेय म्हणून कुत्रे घराजवळ फिरकत नाही.

यातूनच मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला वैतागलेल्या नागरिकांकडून दिलासा मिळाल्याचा दावाही केला जात आहे. अर्थात कालांतराने या लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्यांमधील रंग उन्हामुळे कमी होतो. तसेच या बाटल्यांची सवय पडल्यानंतर कुत्र्यांचा वावर परत सुरू होतो, असाही एक मतप्रवाह आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button