Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar South

दिव्यांग मुलांचा विवाह पाहून कुटुंबीयांचे डोळे पाणवले

अहमदनगर :- मुला-मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे विवाह जुळवण्याच्या प्रक्रियेमध्ये अलीकडे अनंत अडचणी निर्माण होत आहेत. तर विवाह कशा पध्दतीने चांगला होईल यासाठी वारेमापपणे खर्च केला जातो.

मात्र विवाह दिव्यांगांचा असल्यास या अडचणींमध्ये आणखीच भर पडते. घरची बिकट परिस्थितीमुळे अनामप्रेम संस्थेने आधार दिलेल्या दोन दिव्यांग जोडप्यांचा विवाह सेवाप्रीत सोशल फाऊंडेशन या महिला संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या थाटात हॉटेल संजोगमध्ये लाऊन दिला.

सामाजिक बांधिलकी जोपासत सेवाप्रीतच्या महिला सदस्यांनी आपल्या परीने मदत करीत हा विवाह सोहळा थाटात पार पाडला. एखाद्या श्रीमंत कुटुंबालाही लाजवेल अशी व्यवस्था सेवाप्रीतने या लग्नसमारंभात केली होती. या विवाहाची सर्वत्र चर्चा आहे. अनामप्रेम संस्थेच्या पुढाकाराने 8 महिन्यापुर्वी राहुल महामाहिम यांचा मोनिका फिस्के यांच्यासह तर धनंजय साळुंखे यांचा श्‍वेता इंगळे यांच्याशी विवाह ठरला.

मात्र या दिव्यांगांची घरची परिस्थिती नाजुक असल्याने हा खर्च कसा पेलवायचा हा प्रश्‍न पडला होता. सामाजिक कार्यात सक्रीय असलेले व अनामप्रेम संस्थेला वेळोवेळी मदत करणार्‍या सेवाप्रीतच्या सदस्यांपुढे हा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यांनी क्षणाचाही विचार न करता लग्नाची तारीख ठरवण्याचे सांगून, संपुर्ण लग्न लाऊन देण्याची तयारी दर्शवली.

या सेवाप्रीतच्या महिला सदस्यांनी दिलेल्या योगदानातून या दिव्यांग जोडप्यांचा विवाह थाटात पार पडला. मोनिका फिस्के ही स्नेहालयाच्या स्नेहाधारची माजी विद्यार्थिनी आहे. तीचे वडिल फुगे विकून आपला उदरनिर्वाह करायचे तर त्याची आई मानसिकदृष्ट्या आजारी आहे.

तीने 12 वी पर्यंन्त शिक्षण घेऊन स्नेहालयाच्या जनसंपर्क विभागात कार्य केले असून, सध्या ती पुणे येथे नोकरी करुन पदवीचे शिक्षण घेत आहे. तर राहुल महामाहिम याने नगरच्या पाऊलबुधे महाविद्यालयात इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे.

तो सध्या औरंगाबाद येथील कंपनीत कार्यरत आहे. दुसरे दांम्पत्य धनंजय हा सातारा येथील असून, तर श्‍वेता श्रीरामपूर येथील असून दोन्ही जॉब करत आहे. जणू आपल्या घरचेच लग्न असल्याप्रमाणे सेवाप्रीतच्या महिलांनी वधू-वरांच्या कपड्यापासून मंगळसूत्र तर लग्नातील वर्‍हाड्यांची जेवाणा पर्यंन्तची सर्वोत्तम व्यवस्था केली होती.

लग्नाला आलेले अनेक पाहुणे हा विवाह पाहून भारावले. वधू-वरांवर तांदुळाची अक्षता न टाकता फुलांचा वर्षाव करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत अनामप्रेमचे अजित माने यांनी केले. प्रास्ताविका जागृती ओबेरॉय यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून हा विवाह लावण्यासाठी पुढाकार घेतला असून, दिव्यांग देखील हे समाजाचा एक घटक असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या कुटुंबातील दिव्यांग मुलाचा हा शाहीथाटात झालेला विवाह पाहून नातेवाईकांचे डोळे पाणवले. या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याला अनामप्रेमच्या दिव्यांग बांधवांच्या सुमधूर आर्केस्ट्राची साथ लाभली.

हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, अर्चना खंडेलवाल, अन्नू थापर, गीतांजली माळवदे, गीता नय्यर, निशा धुप्पड, डॉ.सिमरन वधवा, सविता चड्डा, रितू वधवा, कशीश जग्गी, अनुभा अ‍ॅबट, रुपा पंजाबी आदींसह सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.

या उपक्रमास अजीत माने व प्रदीप पंजाबी यांचे सहकार्य लाभले. वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी अनामप्रेमचे दिपक बुर्रम, अविनाश मुंडके, संजय खोंडे, विष्णू वारकरी, महेश लाडे, दिपक पापडेजा आदींसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close