Ahmednagar NewsAhmednagar SouthBreaking

मुलासोबत झालेल्या भांडणातून श्रीगोंद्यातील सातवीच्या विद्यार्थिनींनीच केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव !

श्रीगोंदा :- शाळेत जाण्याचा कंटाळा व रस्त्याने जाताना वर्गातील मुलासोबत झालेल्या वादावरून शाळेत शिक्षक ओरडतील या भीतीमुळे शाळेत जायचे नाही म्हणून सातवी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मैत्रिणींनी घरी न जाता वाट सापडेल तिकडे जाण्याचा निर्णय घेतला.

परंतु एका शिक्षकाच्या जागरुकतेमुळे या मुली पुन्हा घरी सुखरूप पोहोचल्या खऱ्या परंतु पालक ओरडतील म्हणून या मुलींनी आयडियाची कल्पना करून डोकं वापरत आपल्या दोघींचे अपहरण झाल्याचा बनाव रचला. पण पोलिसांच्या चौकशीत हा सर्व प्रकार खोटा असून मुलींनी स्वत:च्या अपहरण नाट्याचा बनाव केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

शिक्षणाचा कंटाळा तसेच रस्त्याने जाताना वर्गातील एका मुलासोबत झालेले भांडण या भांडणाबाबत शिक्षकांना समजल्यावर आपल्याला शिक्षक ओरडतील या भीतीपोटी दि. २९रोजी शाळा सुटल्यावर सातवी इयत्तेत शिकणाऱ्या दोघी मैत्रिणींनी घरी न जाता शेजारच्या गावाच्या दिशेने गेल्या.

त्याठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला त्यांनी आपल्या सायकल लावून त्या चालत रस्त्याने जात असताना एका व्यक्तीला या लहान मुली दोघीच रस्त्याने एवढ्या उशिरा कुठे चालल्यात याबाबत शंका आली. त्यांनी त्या मुलींना कुठं जायचे विचारले असता त्यावर त्यांनी श्रीगोंदयाला जायचे असे सांगितले.

त्या व्यक्तीने या दोघींना श्रीगोंदयात आणून सोडले व त्यानंतर त्या दोघी मांडवगण रोडने पुन्हा पायी चालत गेल्या. काही अंतर गेल्यानंतर एका शिक्षकाने या दोघा मुलींना पाहिले.

अंधार पडायला लागलेला असताना एवढ्या उशिरा तुम्ही कुठं चालल्या असे विचारले असता आता घरच्यांना खरा प्रकार समजला तर घरचे आपल्याला ओरडतील त्यामुळे या मैत्रिणींनी आपलं डोकं वापरत या शिक्षकाला आमचे अपहरण झाले होते, आमच्या घरच्यांना फोन करा असे सांगितले.

शिक्षकाने घरच्यांना फोन करून बोलावून घेत मुलींना घरच्यांकडे सोपवले. तोपर्यंत गावात या अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची चर्चा पसरली होती. मुलीचे पालक या दोघी मुलींना घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले तेव्हा या मुलींनी पोलिसांना आमची शाळा सुटल्यावर एका ओमीनी गाडीतून अनोळखी चार इसम आमच्याजवळ आले,

आमच्या तोंडाला रुमाल लावून आम्हाला बेशुद्ध करून आमचे त्यांनी अपहरण केल्याचे सांगितले. अपहरण करणारे श्रीगोंद्यात जेवणासाठी हॉटेलवर थांबले तेव्हा आम्ही दोघी शुद्धीवर आलो. आम्ही नजर चुकवून गाडीतून पळून जाऊन एका झाडाच्या मागे लपलो.

त्यानंतर त्या अपहरणकर्त्यांनी आजूबाजूला आमचा शोध घेतला पण आम्ही त्यांना सापडलो नाही. त्यामुळे ते निघून गेले व त्यानंतर आम्ही दोघी रस्त्याने जात असताना आम्हाला शिक्षक भेटले.

त्यामुळे आम्ही घरी सुखरूप पोहोचलो असे सांगितले. दरम्यान, हे सांगत असताना दोन्ही मुलींच्या सांगण्यात तफावत जाणविल्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी या दोघी मुलींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता मुलींनी पोलिसांना खरा प्रकार सांगितला आणि या मुलींच्या अपहरण नाट्याचा बनाव उघड झाला.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button