Lifestyle

कसा असावा गणेशोत्सव ?

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात, जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. सन १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणार्‍या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले.

या उत्सवाच्या निमित्ताने भारतातील जनता एकवटेल. त्यातील सांस्कृतिक आणि बौद्धिक कार्यक्रमांच्या रुपाने तिच्यात जनजागृती निर्माण करता येईल. आपली संस्कृती आणि धर्म याबाबत तिच्या मनात नवी अस्मिता जागृत होईल अशी ही भावना लोकमान्य टिळकांच्या मनात होती सर्व भारतीय लोकांनी आपसातले भेद सोडून एकत्र यावे ही लोकमान्य टिळकांची मुख्य इच्छा होतीअलीकडच्या काळात “लोकमान्यांनी उदात्त हेतूने सुरू केलेल्या या उत्सवाला हे कसले स्वरूप पात्र झाले आहे?” असे निराशेचे उद्गार अनेक वेळा ऐकावे लागतात.

काही गणेशोत्सव मंडळांची ‘वर्गणी’, ही वर्गणी असते की ‘वसुली’ हेच कळत नाही. आज गणपतीला किती सोने, पैसे या श्रीमंतीवर त्या गणपतीचे महती ठरते आहे, काही मंडळे दरवर्षी मोठ मोठी मंदिरे उभारून दहा दिवसांनी परत ती तोडून टाकतात त्यासाठी किती तरी लाख रुपये खर्च होतात. १० दिवसांचा ‘गल्ला’ जमवणारी दुकानं मांडणारी, गणेशोत्सव मंडळे बेसुमार वाढली आहेत. विसर्जनाच्या मिरवणुकीची कालमर्यादा तर कधीचीच ओलांडली आहे.

विसर्जनाच्या मिरवणुकीत होणारया महिलांच्या छेडाछेडीने तर यावर्षी कळस गाठला. गजाननाशी काडीमात्र संबंध नसलेले हिडीस डान्स कोण बंद करणार? दिवसेंदिवस गणेशोत्सव हा ‘उत्सव’ राहिला नसून, तो आता एक ‘event’ होऊ लागला आहे.आजच्या परिस्थितीत लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या या गणेशोत्सोवात किती गणेशोत्सव मंडळांना, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची आठवण येत असेल?

लोकमान्यांनी जनजागृतीसाठी सुरू केलेल्या गणेशोत्सवातून समाजप्रबोधन व्हावे, हाही त्यांचा उद्देश होता. त्या अनुषंगाने काही सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. कलाकाराच्या कलागुणांना वाव देऊन, सर्वसामान्यांच्या ज्ञानात भर पडेल असे उपक्रम राबविले जात. वक्त्यांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध करून, व्याखानमाला आयोजित केल्या जात असत.

आजही ही प्रथा अव्याहतपणे चालू ठेवणारी अनेक गणेशोत्सव मंडळे आहेत; परंतु त्यामधे वाढ झाली पाहिजे. वकृत्व स्पर्धा, लेखक, साहित्यिक, कवी, नाटककार यांच्या भाषणांचे किवा कलागुनांचे मार्गदर्शन पर कार्यक्रम या काळात सादर केले पाहिजेत. त्यांच्या अनुभवपर मार्गदर्शनातून नवीन पिढीला योग्य दिशा मिळू शकते.गणेशोत्सवातील देखाव्यांवर कमीत कमी खर्च करावा. देखावे हे सामाजिक जाणीव जागृती या विषयांवर असावेत.

गणेशोत्सवातील वर्गणी हा एक मोठा मुद्दा आहे. वर्गणी हि इच्छिक असावी ती जबरदस्तीने लोकांकडून वसूल करू नये. लोकांनी स्व-इच्छेने दिलेल्या वर्गणी चा स्वीकार केला पाहिजे. मंडळाला मिळालेल्या वर्गणीतून एक हिस्सा सामाजिक कार्यासाठी खर्च करावा. मिळालेल्या व खर्च केलेल्या सर्व पैशाचा हिशोब हा जाहीर करायला हवा.

गावातील सामाजिक कार्यामध्ये सर्व गणेश मंडळाचा सहभाग असायला हवा. गणेशोत्सवात सिने नट व नटी यांना आमंत्रित करू नये. गणेशोत्सवातील विविध प्रकारच्या जाहिरातबाजी व नेत्यांच्या पोस्टरबाजी वर बंदी आणायला हवी.शिस्तबद्ध वातावरणात विसर्जन मिरवणुक झाली पाहिजे.

विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे व पाश्चात्य पद्धतीच्या वाद्यांचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर केला पाहिजे जेणे करून हिडीस गाण्यांवर हिडीस नृत्य करणाऱ्यांना थांबविता येईल. गुलाल चा वापर कमी केला पाहिजे. अशा पद्धतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला तरच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना आदरांजली वाहिली जाईल.
लेखक : अतुल पगार (मास्टर्स ऑफ जर्नालिझम)

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button