गरज पडली की बारामतीत यायचं सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले?

Published on -

अहमदनगर – गरज पडली की बारामतीत यायचं. साहेबांचं कौतुक करायचं. सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले? दोन्हीकडून वाजणाऱ्या ढोलासारखं राष्ट्रवादीच्या विरोधकांचं राजकारण सुरू आहे.

पण आता बस्स झालं, असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे. अनेक नेते व आमदार पक्ष सोडून गेले आहेत.

आणखीही काही लोक जाण्याच्या मार्गावर आहेत. सत्ताधारी भाजपा – शिवसेना यासाठी पवारांच्या राजकारणाला दोष देत आहे. त्यावरून रोहित पवार संतापले आहेत. फेसबुकवर एक विस्तृत पोस्ट लिहून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

सर्वप्रथम त्यांनी पक्षबदलूंवर तोफ डागली आहे. स्वत :च्याच घरात आमदारकी, खासदारकी ठेवणारेच सध्या कुंपणावरून उड्या मारत आहेत. जाड – भरडं पीठ दुसऱ्या पक्षात गेलं. आता जमीनच नांगरायची वेळ आली आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीतील गळतीसाठी शरद पवारांना जबाबदार धरणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला आहे. कुणीही उठावं आणि बोट दाखवावं असं पवार साहेबांचं राजकारण निश्चितच नाही. गेल्या ५० वर्षांतल्या तीन पिढ्या याला साक्ष आहेत.

त्यांच्या राजकारणामुळे ज्यांनी शेतीतून चार पैसे कमावले. त्यांच्या मुलानं तालक्याच्या ठिकाणी चांगलं शिक्षण घेऊन नोकरी केली आणि आता त्यांचा नातू आयटी कंपनीत नोकरी करू लागलाय, शेतीपासून आयटी पार्क उभा करण्यापर्यंतची ही शृंखला आहे.

महिलांना समान संधी देण्यापासून ते उपेक्षित व दीनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा प्रवास आहे. राजकीय दबावाला बळी न पडता वंचित व अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेल्या निर्णयाचा जातीपाती व धर्माधर्मात भांडण लावण्याचा नव्हे तर माणसे जोडण्याचा हा इतिहास आहे, असं रोहित यांनी म्हटलंय, सामान्य माणूस आजही पवारांच्या सोबत आहे, असा दावाही रोहित यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!