Ahmednagar NewsAhmednagar SouthBreaking

सालकरी की मालक निवडायचा याचा निर्णय जामखेडकरांनी घ्यावा

जामखेड: सालकऱ्याचा मुलगा सालकरी राहतो, मालकाचा मुलगा मालकच राहतो. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या जनतेने सालकरी निवडायचा की, मालक निवडायचा याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.

शेतीचा पाणीप्रश्र सोडवण्यासाठी ‘कृष्णा-भीमा-सीना स्थिरीकरण प्रकल्प’ राबवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर जामखेड शहरातील राज लाॅन्सवर घेण्यात आले. या वेळी मंत्री शिंदे बोलत होते.

ओरनेट टेक्नोलाॅजीचे राम भोजणे, सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती सूर्यकांत मोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, माजी सभापती डाॅ. भगवान मुरूमकर, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, सोमनाथ राळेभात, शरद भोरे, ज्योती क्रांती पतसंस्थेचे अध्यक्ष आजिनाथ हजारे,

सखाराम भोरे, सलीम बागवान, अमजद पठाण, मनोज कुलकर्णी, प्रवीण सानप, मकरंद काशीद यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री शिंदे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

गेल्या ७० वर्षांत या मतदारसंघात नेमके कोणते काम केले हे सांगता येत नाही. त्यामुळे रांगोळी स्पर्धा घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी जामखेड तालुक्यातील भुतवडा जोड तलाव आणि अमृतलिंग तलावाच्या कामास प्रारंभ केला. मात्र, नंतरच्या १५ वर्षांत काँग्रेस – राष्ट्रवादी सरकारने या दोन्ही प्रकल्पांना कसलाही निधी दिला नाही.

त्यामुळे हे प्रकल्प रखडले. २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर मी या रखडलेल्या प्रकल्पांना प्राधान्य देत निधी मिळवून कामे पूर्ण केली, असे शिंदे यांनी सांगितले.

तालुका पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम याच लोकांनी केले आणि आज मात्र निवडणुकीच्या तोंडावर जनतेची कुचंबणा करण्याचे काम या लोकांकडून चालू आहे, असे सांगून मंत्री शिंदे म्हणाले, गेली पाच वर्षे मतदारसंघातील रस्ते, तसेच अन्य विविध विकासकामांना निधी मिळवत मी कामे केली. भोजणे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

जामखेड येथील कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात बोलताना ४० दिवस मला द्या, ५ वर्षे तुमच्यासाठी… असे पालकमंत्री शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले. विधानसभा निवडणूक १५ ऑक्टोबरच्या आसपास होणार असल्याने पुढील ४० दिवस तुम्ही मला द्या. पुढील ५ वर्षे मी तुमच्यासाठी असणार आहे, असे ते म्हणाले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button