७४ व्या वर्षी आजी झाली आई !

Published on -

गुंटूर : वयाच्या ७४ व्या वर्षी एका महिलेने कृत्रिम गर्भधारणेच्या माध्यमातून जुळ्या मुलींना जन्म दिल्याची सुखद घटना गुरुवारी आंध्रप्रदेशच्या गुंटूर शहरात घडली. लग्नाच्या ५७ वर्षांनंतरदेखील बाळ होत नसलेल्या या वयोवृद्घ दाम्पत्याने आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करत बाळाला जन्म दिला.

डॉक्टरांनुसार या वयात आई होण्याचा हा जागतिक विक्रम असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद होण्याची शक्यता आहे. यापूर्वीचा विक्रम स्पेनच्या एका ६६ वर्षीय महिलेच्या नावावर आहे.

 पूर्व गोदावरी जिल्ह्यातील नेललापतीर्पाडूमध्ये राहणारे ८० वर्षीय वाय. राजा राव आणि त्यांची पत्नी मंगायम्मा यांना लग्नाच्या ५७ वर्षांनंतर देखील मूलबाळ होत नव्हते. त्यातच शेजारची एक ५० वर्षीय महिला आयव्हीएफ तंत्रज्ञानाने गर्भवती झाल्याची माहिती मंगायम्मा यांच्या कानावर आली होती. यानंतर गेल्यावर्षी या दाम्पत्याने आयव्हीएफ तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे ठरविले.

त्यानुसार त्यांनी अहिल्या नर्सिंग होम गाठले. दाम्पत्याला बाळाची इच्छा असल्याने डॉक्टरांनी मंगायम्मा यांची कृत्रिम गर्भधारणा केली. यानंतर गेल्या ९ महिन्यांपासून त्या रुग्णालयातच होत्या. अखेर गुरुवारी सकाळी सीझेरियनद्वारे मंगायम्मा यांनी दोन स्त्री अर्भकांना जन्म दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!