Ahmednagar NorthBreakingMaharashtra

कोपरगावात निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे !

कोपरगाव :- विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार याची खात्री पटल्याने सहकार सम्राट हादरले आहेत. प्रत्येक गावात, वाड्यावस्त्यांवरील सहकारी संस्थांमधील हक्काचे कर्मचारी हेरगिरी करण्यासाठी त्यांनी नेमले आहेत.

गेल्या किमान तीन महिन्यांपासून तथाकथित लोकप्रिय नेत्यांनी सहकारातील कर्मचाऱ्यांना स्वतःचे गुलाम समजून राजकारणासाठी राबवणे चालू आहे, असा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला.

नरेंद्र मोदी विचार मंचाच्या पत्रकात म्हटले आहे, नेत्यांनी नेमलेल्या या कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे काम म्हणजे गावात कोण कुणाला भेटतात, कोणत्या संघटनेला पैशांची गरज आहे, कुणाला टाळमृदंग पाहिजे, कोण अडचणीत आहे, कुणाच्या घरी-वस्त्यांवर बैठका होतात,

अंत्यविधी-दशक्रिया-वर्षश्राद्ध-धार्मिक सप्ताह-गर्दी कुठे आहे, वाढदिवस कुणाचे आहेत, आपले कार्यकर्ते दुसऱ्या गटाशी बोलतात का, विजय वहाडणे येऊन गेले का, कुणाशी बोलले, काय बोलले, सोबत कोण कोण होते, कुणाला गळाला लावता येईल असा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.

अनेक वर्षांपासून सहकार सम्राटांनी सहकारी संस्थांचा मनमानी गैरवापर करून निवडणुका लढवल्या. कोट्यवधी रुपये उधळले. आता मात्र प्रस्थापित धनदांडगे गडबडले आहेत.

धावपळ करताहेत, शुभारंभ-नारळ फोडण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. काही संघटना, मंडळांना पैशांची खैरात चालू आहे. वहाडणे यांना गावोगावी मिळत असलेला प्रतिसाद बघता येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे.

कोपरगाव मतदारसंघातील शेती, शेतकरी पाण्यापासून वंचित आहे, बेरोजगार तरुण संतप्त आहेत. वर्षानुवर्षे आमदारकी भोगणाऱ्यांनो जनताच जाणून आहे हे लक्षात असू द्या. हक्काचे पाणी गेल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना सहकारातील बोके मात्र पैशांची मस्ती दाखवताहेत. ही मस्ती मतदार उतरवल्याशिवाय राहणार नाहीत.

सहकारी संस्थांचे कर्मचारी वापरून घेण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे सहकार सम्राटांना स्वतःच्याच कार्यकर्त्यांवर विश्वास राहिलेला नसल्यामुळे त्यांच्यावर हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम या कर्मचाऱ्यांना दिले आहे. आता तरी साहेब, दादा, ताईंच्या कार्यकर्त्यांनी भानावर यावे,

तुमच्यावर पाळत ठेवण्यासाठी कर्मचारी नेमलेत. आता तरी स्वतःचा स्वाभिमान जागा करा, किती दिवस ठरावीक घराण्यांचे जोडे उचलणार, असे नरेंद्र मोदी विचार मंचाचे तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे, शहराध्यक्ष विनायक गायकवाड यांनी म्हटले आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button