शिंदे साहेब तुम्हीच मन मोठं करा आणि कर्जतच्या भूमीपुत्राला संधी द्या…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्जत – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना सोडून भाजपतील मोठा गट राऊत यांच्या गळाला लागल्याने मतदारसंघातील राजकारणाला वेगळी कलाटणी लागली आहे. उमेदवारीसाठी प्रा. राम शिंदे व नामदेव राऊत हे दोघे दावेदार झाल्याने पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

पक्षाने आठ दिवसात निर्णय घ्यावा अन्यथा आपल्याला सर्व पर्याय खुले असल्याचे राऊत यांनी जाहीर केले आहे. मात्र पालकमंत्र्यांना सोडून मतदारसंघातील किती नेते राऊत यांना अखेरपर्यंत साथ देतात.

त्यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. राऊत यांनी बंड केल्यास मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांना ‘शिंदे यांच्यासोबत राहायचे की ‘राऊत’ यांना साथ द्यायची हा मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे.

राऊत यांनी आपल्या भाषणात पालकमंत्री शिंदे हे अनेकदा सांगूनही सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सांगितले. त्यांची पालकमंत्र्यांबाबतची नाराजी दिसून आली. मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांनी हात उंचावून त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. दररोज पालकमंत्र्यांचे गोडवे गात त्यांच्यासमवेत फिरणारे लगेच राऊत यांच्या गळाला कसे लागले? हा एक प्रश्न आहे.

पालकमंत्र्यांचा दौरा होताच त्यातील अनेक चेहरे पुन्हा त्यांच्यासमवेत दिसतील यात शंका नाही. राऊत जोपर्यंत अंतिम निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत मुलगा एकाकडे आणि वडील दुसरीकडे अशी नेहमीची स्थिती दिसणार आहे.

पालकमंत्र्यांना पहिल्यांदाच अशा प्रसंगाला सामोरे जावे लागलेले आहे. विरोधकांनाही आपलेसे करून पालकमंत्र्यांनी आपली राजकारणाची घडी बसवलेली असताना पक्षांतर्गत डोकेदुखी वाढली आहे. कार्यकर्त्यांमध्ये असणारी अस्वस्थता राऊत यांना स्वस्थ बसू देत नाही.

भाजपची उमेदवारी जरी मिळाली नाही, तरी त्यांना पक्षाकडून काही मोठी ऑफर आल्यास त्यांची बंडाची भूमिका बदलू शकते. त्यामुळे येत्या आठ दिवसात घडणाऱ्या घटनांवर मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.

मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे साहेब तुम्हीच मन मोठं करा आणि कर्जतच्या भूमीपुत्रांना संधी द्या, असे आवाहन केले. पालकमंत्र्यांना उद्देशून तसे पत्रही सोशल मीडियातून व्हायरल झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री या आवाहनाला दाद देत आपली उमेदवारी मागे घेतील काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Comment