आ. कर्डिले यांच्या प्रयत्नांना यश !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

करंजी : पाथर्डी व नगर तालुक्यातील चौदा कामांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारी टप्पा दोनसाठी राज्य सरकारकडून शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने करंजीसह चौदा गावांचे भाग्य या नवीन योजनेच्या कामामुळे उजळणार आहे.

वांबोरी चारीचे पाणी डोंगराच्या कडेकडेने यावे. अशी अनेक दिवसांची मागणी पाथर्डी व नगर तालुक्यातील जनतेने लावून धरली होती. त्यासाठी रस्तारोको आंदोलने, मोर्चे देखील काढले तब्बल तीस वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आ.शिवाजीराव कर्डिले यांनी ही मागणी प्रत्यक्षात उतरवली.

वांबोरीचारी टप्पा दोनमध्ये नगर तालूक्यातील खोसपुरी, मजलेचिंचोली,उदरमल, आव्हाडवाडी या चार गावांचा समावेश आहे. तर पाथर्डी तालुक्यातील कोल्हार, डमाळवाडी, गीतेवाडी, डोंगरवाडी, धारवाडी, वैजूबाभळगाव , लोहसर, भोसे, दगडवाडी, करंजी या गावांचा समावेश आहे.

चौदा गावातील तेहेतीस पाझर तलाव या योजनेच्या पाण्यातून भरले जाणार आहेत. वांबोरी चारी टप्पा दोनच्या मंजुरीसाठी या भागाचे आमदार कर्डिले हे गेली दोन वर्षांपासून प्रयत्नशील होते.

कोणत्याही परिस्थितीमध्ये वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाला मंजुरी आणायची असा निश्चय त्यांनी केल्याने, खऱ्या अर्थाने वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाला मंजुरी मिळाली.

त्याकामासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरी येथील सभेत केली. नगर तालुक्यातील चार गावे तर पाथर्डी तालुक्यातील दहा गावे या योजनेच्या कामांमुळे सिंचनाखाली येणार आहेत.

पाथर्डी व नगर तालूक्यातील आणखी काही वंचित गावे या टप्पादोनमध्ये समाविष्ट करण्यासाठी देखील आ कर्डिले प्रयत्नशील आहेत. मुळा धरणापासून पुढे ३३ किलोमीटर पांढरीच्या पुलापर्यंत स्वतंत्रपणे लोखंडी पाइप लाइन टाकली जाणार आहे.

तेथून पुढे सिमेंटचे पाईप वापरले जाणार आहेत. वांबोरी चारीचे पाणी डोंगराच्या कडेकडेने यावे ही तीस वर्षांपूर्वीची मागणी पहिल्या टप्यात जरी पूर्ण झाली नसली तरी दुसऱ्या टप्यात मात्र ती प्रत्यक्षात उतरणार आहे.

आमदार कर्डिले यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या योजनेचे भाग्य उजळले असून, आचारसंहिता लागण्यापूर्वीच मुख्यमंर्त्यांनी या योजनेबाबत केलेली महत्त्वपूर्ण घोषणा या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरली आहे. मुख्यमंर्त्यांनीच या योजनेच्या कामाविषयी घोषणा केल्याने आता ही योजना निश्चित स्वरूपात मार्गी लागणार असे म्हणायला काहीच हरकत नाही.

Leave a Comment