Breaking

दिवाळीला उसाचे अंतिम पेमेंट देणार- पिचड

अकोले : अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दीपावलीला साखरेबरोबरच उसाचे अंतिम पेमेंट देऊन दिवाळी गोड करणार आहे, अशी ग्वाही माजीमंत्री कारखान्याचे संस्थापक चेअरमन मधुकरराव पिचड यांनी दिली.

अगस्ती सहकारी साखर कारखान्याची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानावरून श्री. पिचड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा. आ. वैभवराव पिचड, जिल्हा बँकेचे चेअरमन तथा कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे,

ज्येष्ठ नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्ष दशरथ सावंत, अभिनवचे अध्यक्ष मधुकरराव नवले, फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठल चासकर, जनलक्ष्मीचे चेअरमन भाऊपाटील नवले, नगराध्यक्षा संगीता शेटे, शेतकरी संघटनेचे शरद देशमुख,

जि. प. सदस्य रमेश देशमुख, भाजप तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, शिवाजी धुमाळ, अगस्ती साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्रकाश मालुंजकर उपस्थित होते. श्री. पिचड पुढे म्हणाले, गतवर्षी दुष्काळाची परिस्थिती असतानाही हंगाम सुरू करायचा आहे.

यावर्षी बाहेरून ऊस आणण्याशिवाय पर्याय नाही. यावर्षी आपण इथेनॉल प्रकल्प पूर्ण करीत आहोत. या प्रकल्पासाठी सरकारने पन्नास टक्के रकमेवर व्याजात सूट दिली आहे. निळवंडे आणि आढळा धरण यांचे अकोले तालुक्यातील आठ गावांचे लाभक्षेत्र एकच असून, आढळेचे क्षेत्र वगळावे लागेल. वीरगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्याचाही विचार करू.

शासनाच्या नवीन नियमानुसार साखरेच्या घाऊक विक्रीबरोबरच किरकोळ विक्रीही करावी लागत आहे, असेही पिचड म्हणाले. सीताराम गायकर म्हणाले, गतवर्षीच्या गळीत हंगामात ६ लाख ७७ हजार मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले. ११.७६ टक्के इतका उतारा मिळाला.

१६७ दिवस हंगाम सुरू होता. रोज ३५०० मेट्रिक टन उसाचे गाळप सरासरी होत होते. निफाड, सिन्नर, इगतपुरी, नेवासा, राहुरी येथून तसेच कार्यक्षेत्रातील ऊस असे एकूण ५ लाख ७६ हजार मेट्रिक टन गाळप करण्यात आले.

यंदा कार्यक्षेत्रात सव्वादोन लाख टन ऊस उपलब्ध असून, साडेचार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गळीत हंगामाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. इथेनॉल प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. कारखान्याने घेतलेल्या विविध कर्जापोटी यावर्षी कारखान्याने सुमारे ४० कोटी रुपयांची परतफेड केली आहे. जिल्हा बँकेने व्याजात एक टक्का सूट दिल्याने कारखान्याचे १० कोटी रुपये वाचल्याचे गायकर म्हणाले

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button