श्रीरामपूरच्या सर्वच पक्षांच्या उमेदवारीचा पेच कायम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीरामपूर :- अद्याप एकाही राजकीय पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला नसल्याने नेमकी कोणाला उमेदवारी जाहीर होईल याबाबत कार्यकर्त्यांसह मतदारांनाही उत्सुकता लागली आहे. तालुक्यात प्रभाव असलेल्या माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह ससाणे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने सर्वच उमेदवार गॅसवर आहेत.

मंत्री राधाकृष्ण विखे भाजपत, तर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत गेल्याने गेल्या निवडणुकीपेक्षा या वेळी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. या मतदारसंघात राधाकृष्ण विखे विरुद्ध आमदार बाळासाहेब थोरात असाच प्रमुख राजकीय सामना रंगणार आहे. या सामन्यात ससाणे, आदिक, मुरकुटे गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर समर्थक आहेत. त्यांच्याकडे अशोक उद्योग समूहाची मोठी यंत्रणा असल्याने ते ज्या उमेदवाराला समर्थन देतील त्यांना फायदा होईल. दिवंगत जयंत ससाणे यांचेही ग्रामीण भागासह शहरात अनेक समर्थक असल्याने ससाणे गटाची भूमिकाही महत्त्वाची ठरेल.

अलीकडच्या काळात विखे यांचेही समर्थक तालुक्यात वाढले आहेत. शिवाय राहुरी तालुक्यातील ३२ गावे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात आहेत. तनपुरे साखर कारखान्याच्या माध्यमातून तिकडेही त्यांची पकड आहेच. त्यामुळे विखे गटाचीही भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरेल. उपनगराध्यक्ष करण ससाणे हे विखे समर्थक असल्याने ससाणे गट विखे सांगतील तीच भूमिका घेईल.

विखे व ससाणे गट काँग्रेसपासून दूर गेले आहेत. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसची मदार सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आदिक गटावर आहे. नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी शहरात चांगली पकड घेतली असून ग्रामीण भागातही गोविंदराव आदिक व अविनाश आदिक यांना मानणारा मोठा गट आहे.

काँग्रेसला वैयक्तिक मोठे संघटन उभे करावे लागणार आहे. तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद सध्या जास्त असल्याने श्रीरामपूरची जागा राष्ट्रवादीला मिळण्याबाबतही पदाधिकाऱ्यांमध्ये सूर आहे. दरम्यान, उमेदवारीसाठी भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने इच्छुक असलेले डॉ. चेतन लोखंडे, लहू कानडे, रामचंद्र जाधव यांच्यावर सावट आले.

डॉ. लोखंडे यांच्या उमेदवारीबाबत आजही सेनेचा एक गट आशावादी आहे. काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल या अपेक्षेने लहू कानडे यांनी त्या पक्षात प्रवेश केला. रामचंद्र जाधव यांनीही शहरातील शिवसेनेचे संपर्क कार्यालय बंद करून काँग्रेसकडून उमेदवारीची मागणी केली आहे.

अगोदरच काँग्रेसकडून मागील निवडणुकीपासून प्रयत्न करीत असलेले राहुल गांधींशी जवळीक असलेले युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हेमंत ओगले यांच्याही अडचणींत वाढ झाली. ते लोकसभेपासूनच मतदारसंघात सक्रिय आहेत. काही दिवसांपूर्व विखे यांनी आपल्या गटासह ससाणे गट व भाजपच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. प्रत्येकाने वेगवेगळी नावे सूचवली. त्यामुळे सर्वच उमेदवारीबाबत पेच कायम आहे.

Leave a Comment