कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही – आमदार संग्राम जगताप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप यांच्या पक्ष प्रवेशाच्या अनुषंगाने नगर राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

परंतु आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा प्रश्न नाही तसेच याबाबत यापूर्वी वेळोवेळी पत्रकार परिषेदत स्पष्ट केले असताना आपल्या उमेदवारीची भीती वाटणारी मंडळीच नाहक आपल्या पक्षप्रवेशाच्या वावड्या उठवित आहेत.

आपण आता कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत. कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम करावे, असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले आहे.

आ. जगताप यांच्या अन्य राजकीय पक्षप्रवेशाच्या चर्चेच्या अनुषंगाने उठत असलेल्या वावड्यांसंदर्भात  संपर्क साधला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

नगर शहर विधानसभा मतदार संघात शिवसेना – भाजप यांच्यात युती झाल्यास व नगर शहराची जागा या आधीच्या निवडणुकांमध्ये युती अंतर्गत शिवसेनेकडे असल्याने माजी मंत्री शिवसेना उपनेते अनिल राठोड हे सेनेकडून उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत.

यंदाच्या वर्षी शिवसेना स्तरावरील उमेदवारांच्या मुलाखतींमध्ये नगर शहरातून माजी महापौर भगवान फुलसौंदर तसेच माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे आदींनी मुलाखती दिल्या आहेत. परंतु त्यांच्यात अनिल राठोड यांचे पारडे हे उमेदवारीसाठी निश्चितच जड आहे. 

नगर शहरातील राजकारणाची परिस्थिती पाहता शिवसेना – भाजप युती विरुद्ध काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्यात म्हणजेच माजी आमदार अनिलभैय्या राठोड विरुद्ध विद्यमान आमदार संग्राम जगताप या दोन भैय्यांमध्ये विधानसभेचा सामना होण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना – भाजपा यांच्यातील युती बाबतचा निर्णय कधी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयावर अनेकांची राजकीय गणिते अवलंबून आहेत.

Leave a Comment