धरणे आंदोलनात भूमिपुत्र शेतकरी संघटना सहभाग घेणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पारनेर : शेतीमालाला ऊत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव मिळावा तसेच सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी दि. २ ऑक्टोबर रोज़ी गावागावांत होणाऱ्या धरणे आंदोलनात भूमिपुत्र शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याचे संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी १ जून २०१७ ला ऐतिहासिक शेतकरी संप पुकारला होता. या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांंचे कर्ज सरसकट माफ करण्याची घोषणा केली.

राज्यभरातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपये कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, पण प्रत्यक्षात आज अखेर ८९ लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ४४ लाख ४ हजार १४७ शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, निम्याहून अधिक शेतकरी पात्र असतानाही कर्ज माफीपासून वंचित आहेत.

लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही, जाहीर केलेल्या ३४ हजार कोटींपैकी आजअखेर शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ १८ हजार ७६१ कोटी ५५ लाख रुपये जमा झाले आहेत. यामुळे लाखो शेतकऱ्यांना नव्या पीक हंगामासाठी नवे पीककर्ज मिळाले नाही.

शेतकऱ्यांना यामुळे प्रचंड मन: स्ताप आणि निराशाच सहन करावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर दि. २ ऑक्टोबर रोजी गावा-गावांत होणाऱ्या धरणे आंदोलनात भूमिपुत्र शेतकरी संघटना सक्रिय सहभागी होणार असून, ग्रामसभेत ठराव करून ते राज्यपालांना पाठविण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. या धरणे आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी केले आहे.

Leave a Comment