Ahmednagar NorthBreaking

आमदार मोनिका राजळे एकदा तुमचा सात-बारा तपासून बघा !

शेवगाव : भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, अशा कार्यकर्त्यांना आमदार झाल्यानंतर मोनिका राजळे यांनी खड्यासारखे वेचून बाहेर काढले व स्वत:च्या बगलबच्च्यांना महत्त्वाची लाभाची पदे दिली.

भाजपचे निष्ठावान असे प्रमाणपत्र तुम्ही देण्याची गरज नाही. एकदा तुमचा सात-बारा व फेरफार तपासून बघा, म्हणजे कोण निष्ठावान हे जनताच ठरवेल, अशी टीका ज्येष्ठ नेते शिवाजीराव काकडे यांनी आमदार मोनिका राजळे यांच्यावर केली.

शेवगाव येथे सोमवारी भाजप व मित्रपक्षांचा मेळावा झाला. या वेळी काकडे बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. कृषी समितीचे माजी सभापती दिलीप लांडे होते. काकडे म्हणाले, गेल्या निवडणुकीत मला डावलून पक्षाने राजळे यांना उमेदवारी दिली, तरीही आम्ही पक्षाचे काम प्रामाणिकपणे करून त्यांना निवडून आणले.

मात्र, निवडून आल्यानंतर आमदार राजळे यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना ताकद देण्याऐवजी वेदना व त्रास देण्याचे काम केले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे कार्यकर्ते व जनतेला बदल हवाय असे वाटत असून पक्षश्रेष्ठींनी आता जनता जनार्दनाचा कौल घेऊन त्यांच्या उमेदवारीबाबत योग्य तो निर्णय घ्यायची वेळ आली आहे.

जि. प. सदस्य हर्षदा काकडे म्हणाल्या, आमदार राजळे यांनी ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेने केलेल्या कामांचे नारळ फोडले. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांसाठी शासनाने पिण्याचे पाणी, सिंचन, उद्योग यासाठी साडेचार हजार कोटी दिले, मात्र धरण उशाला असूनही आमदार राजळे यांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी काही केले नाही.

मेळाव्याचे अध्यक्ष लांडे म्हणाले, व्यासपीठावर बसलेल्या आमच्यातील जिरवाजिरवीच्या राजकारणात आमची आम्ही जिरवली व राजळे यांना निवडून आणले. मंत्री पंकजा मुंडे यांनी आम्हाला तुम्ही तयारी करा असा शब्द दिला आहे.

पक्षाने पुन्हा राजळे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. या वेळी माजी जि. प. सदस्य मोहन पालवे, बाळासाहेब सोनवणे, भाजयुमोचे पाथर्डी तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, माजी सभापती संभाजी पालवे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश मगरे, आरपीआयचे पवनकुमार साळवे, बाबासाहेब ढाकणे, दिनकर पालवे यांचीही भाषणे झाली.

येळीचे सरपंच संजय बडे यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब सातपुते यांनी सूत्रसंचालन केले, तर राहुल कारखिले यांनी आभार मानले. मेळाव्यास सुभाष भागवत, जगन्नाथ गावडे, मनोहर झिरपे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button