मंत्रिपदाचे दावेदार विजय औटी यांच्या पराभवासाठी खा.सुजय विखेंसह विरोधक एकत्र !

Published on -

पारनेरमध्ये युतीला तिलाजंली देवून युतीचा धर्म न पाळता भाजपचे खासदार डॉ.विखे औटींच्या अडचणी भर पडण्याचे काम करीत असल्याचे दिसत आहे. अर्थात औटींबद्दल युतीच्या नेत्यांसह कार्यकर्ते व सर्वसामान्य नाराज आहेत. त्याबरोबर औटी हे विजय झाले तर ते पुढे मंत्रिपदाचे दावेदार राहतील. ते दावेदार होवू नये म्हणून आतापासून पाडापाडीचे राजकारण या निमित्त्याने सुरू झाले आहे. 

पारनेर विधानसभा मतदारसंघात विद्यमान शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. राष्ट्रवादीतून नाराज होवून बाहेर पडलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरविण्याचा घाट घातला जात असून अन्य इच्छुकांकडून झावरेंना पाठबळ कसे मिळेल, यासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनी पुढाकार घेतला आहे. 

औटींची नकारात्मक व झावरेंची हक्‍काची मते तसेच दुरावलेल्यांना जवळ करून औटींच्या पराभवासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (झावरेंना मानणारे) व कॉंग्रेस (विखेंना मानणारे) असे सर्व एकत्र वज्रमुठ करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर केल्याने गेल्या दोन महिन्यांपासून उमेदवारीचे दावेदार सुजित झावरे हे नाराज होते. ते भाजप नेत्यांच्या संपर्कात आले. वर्षानुवर्ष राजकीय संघर्ष असलेले सुजित झावरे व राहुल झावरे विखेंच्या भाजप प्रवेशानंतर एकत्र आहे. माजी आमदार नंदकुमार झावरे गट विखेंचे कट्टर समर्थक आहेत. 

आता विखे भाजपमध्ये आल्याने नंदकुमार झावरे गट देखील आज विखेंबरोबर आहे. विखे हे सुजित झावरे यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरविणार आहे. त्या दृष्टीने त्यांनी सुजित झावरे यांच्याबरोबर बराच वेळा चर्चा केली आहे. 

अर्थात जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी देखील निवडणुकीत उतरण्याचा चंग बांधला आहे. कार्ले हे देखील विखे समर्थक आहे. सध्या झावरे यांना जिल्हा परिषद सदस्य माधव लामखडे यांच्यासह अनेक राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे नेते मदत करण्यास तयार आहेत. 

सध्या तरी राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी गावन्‌गाव पिंजून काढून औटींची धास्ती वाढविली आहे. त्यात झावरे रिंगणात उतरल्यास लंकेंना झावरे व औटींची नकारात्मक मते मिळण्याची शक्‍यता आहे, असे असले तरी झावरे यांचे तालुक्‍यात असलेला संपर्क व भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसची मदत झाली तर औटींचा पराभव होण्याची शक्‍यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!