अकोलेत ‘श्रीगोंदा पॅटर्न’ राबविण्याची व्यूव्हरचना !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अकोले  – मला डॉक्‍टर सायबासनी शंभर रुपये द्यायचेत… असे म्हणत एका फाटक्‍या तुटक्‍या कपड्यात असणाऱ्या इसमाने आपली घड्या घातलेली नोट आघाडीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांच्या प्रचारनिधीसाठी दिले… आणि बघता बघता उपस्थित आघाडी प्रेमींनी आपला खिसा रिता केला… अवघ्या पाच मिनिटांत एक लाख रुपयांची मदत आघाडीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांच्या पदरात पडली.

आपला उमेदवार गरीब हाय… म्हणून मला आपल्या डाक्‍टर सायबासनी इलेक्‍शनच्या खर्चासाठी मदत करायची हाय, असे म्हणत अंगावर फाटके कापडं असणाऱ्या एका आदिवासी मतदाराने डॉ. किरण लहामटे यांना आर्थिक मदत म्हणून शंभर रुपये बहाल केले. आपल्यावर सर्वसामान्य जनतेचे असलेले प्रेम पाहून डॉ. लहामटे यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. मग काय अवघ्या पाच मिनिटांत एक लाख 21 हजार रुपयांची मदत डॉ. लहामटे यांच्या झोळीत मतदारांनी टाकली. हे थक्क करणारे दृश्‍य पाहून डॉ. लहामटे गहिवरले नसते तर नवलच.

पिचडांचे कट्टर विरोधक असलेले अशोकराव भांगरे यांनी आपल्याला उमेदवारी जाहीर झाली नाही म्हणून नाराजी धरली नाही. उलट आघाडीतील नेत्यांची मोट बांधून डॉ. लहामटे यांना सर्व प्रकारची मदत होईल, अशी पावले उचलली आहेत. नुकतीच डॉ. लहामटे यांच्या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली. ही बैठक सुरू असतानाच ढोक्री येथील करवर नावाच्या शेतकऱ्याने बैठकीत उभे राहून मला डाक्‍टर सायबाला इलेक्‍शनच्या खर्चासाठी शंभर रुपये दयायचे आहेत, असे सांगितले.

अंगावर फाटके कापडं पण मनाने श्रीमंत असलेल्या या शेतकऱ्याचे उदारमतवादी कृत्य पाहून उपस्थित कार्यकर्ते अवाक्‌ झाले. आपल्या प्रति कार्यकर्त्यांची असलेली निष्ठा पाहून डॉ. लहामटे यांनी या रकमेचा मोठा आदरपूर्वक स्वीकार केला. उपस्थित कार्यकर्त्यांनीही लगेच खिशात हात घालून आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली.

अवघ्या पाच मिनिटांतच एक लाख 21 हजार रुपयांची रोख रक्कम डॉ. लहामटे यांच्या झोळीत खुद्द मतदारांनीच टाकली. आपल्यावरील हे प्रेम पाहून डॉ. लहामटे यांनी तुमची ताकद हीच आपली परिवर्तनची लढाई असल्याचे सांगून मतदारांना धीर दिला.

आर्थिक पाठबळासाठी सरसावली जनता
अकोले विधानसभा निवडणूक यंदा सर्वाधिक चर्चेची ठरली आहे ती पिचड यांच्या पक्ष बदलाने. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोलेत ‘श्रीगोंदा पॅटर्न’ राबविण्याची व्यूव्हरचना रचली आहे. त्यामुळे एकास एकचा हा राजकीय आखाडा रंगणार आहे. त्यामुळे जनशक्तीच्या उमेदवाराला आर्थिक पाठबळ मिळावे, म्हणून जनता गावोगावी हातात झोळी घेऊन आर्थिक मदत गोळा करीत आहे.

Leave a Comment