Ahmednagar NorthBreakingMaharashtra

Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट शिर्डी विधानसभा मतदारसंघ

शिर्डी :- विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून चंद्रभान घोगरे यांचा एकमेव अपवाद वगळता या मतदारसंघावर विखे कुटुंबीयाचंच वर्चस्व आहे. अगोदर बाळासाहेब विखे यांचे मावसभाऊ अण्णासाहेब म्हस्के आमदार होते.

त्यांच्याकडं राज्याच्या जलसंधारण मंत्रिपदाची धुरा होती. 1995 पासून राधाकृष्ण विखे पाटील या मतदारसंघातून निवडून जातात. त्यांना आतापर्यंत आव्हान दिलं गेलं; परंतु आव्हान देणारेच काळाच्या ओघात कुठं गडप झाले, हे कळायला मार्ग नाही.

रवींद्र देवकर, एकनाथ घोगरे, रावसाहेब म्हस्के, धनंजय गाडेकर, शेखर बो-हाडे, डाॅ. एकनाथ गोंदकर यांचं काय झालं, हे सर्वज्ञात आहे. हे नेते आता प्रवाहात कुठंच नाहीत. डाॅ राजेंद्र पिपाडा यांनी मात्र विखे यांना चांगलंच आव्हान दिलं होतं.

विखेविरोध हाच त्यांच्या राजकारणाचा पाया होता; परंतु आता ते भाजपत आहेत आणि विखे यांनी भाजपत प्रवेश केला आहे. दोघंही एकाच पक्षात आहेत. आता विखे यांना विरोध न करता शांत राहणंच पसंत केलं आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर संगमनेर तालुक्यातील अनेक गावं या मतदारसंघाला जोडली गेली. असं असलं, तरी या गावांतील मतदान राहाता तालुक्याच्या तुलनेत कमी आहे. विखे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळं थोरातही या मतदारसंघात लक्ष घालून त्यांचे मेहुणे डाॅ. सुधीर तांबे यांना विखे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील, अशी चर्चा होती; परंतु ही चर्चा चर्चाच राहिली. विखे आणि थोरात यांच्यात कितीही राजकीय शत्रुत्व असलं, तरी ते एकमेकांना जीवनातून उठविण्याइतपत राजकारण करीत नाहीत.

उलट, बाळासाहेब विखे लोकसभेला शिवसेनेचे आणि बाळासाहेब थोरात विधानसभेला काँग्रेसचे उमेदवार असताना आणि एकाच वेळी मतदान असतानाही कार्यकर्त्यांना ‘टीव्ही’ चालवविण्याचा योग्य तो संदेश दिला गेला होता. आताही तसंच झालं आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस, शिवसेना परत काँग्रेस आणि आता भाजप असा राजकीय प्रवास केला आहे. पक्ष कोणातही असला, तरी राधाकृष्ण विखे यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व कायम टिकवून ठेवलं आहे.

गणेश, प्रवरा व आश्वी या तीन परिसरांच्या बनलेल्या या मतदारसंघात विखे यांच्यापुढं आव्हान निर्माण करण्यात काँग्रेस, राष्ट्रवादीला फारसं यश आलेलं नाही. आता दिलेले उमेदवार सुरेश थोरात संगमनेर पंचायत समितीचे सदस्य होते.

त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. बाळासाहेब थोरात यांच्या गावचे एवढीच त्यांची ओळख आहे. लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते असताना युतीचा उघडपणे प्रचार केला आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघात युतीला 60 हजारांचं मताधिक्य मिळवून दिलं.

आता तर ते उघघउघड भाजपमध्ये आहेत आणि ते स्वतःच उमेदवार आहेत. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत देशभऱ मोदी लाट असतानाही विखे यांना 75  हजारांचं मताधिक्य मिळालं होतं.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात गणेश सहकारी साखर कारख़ाना, प्रवरा सहकारी साखर कारख़ाना, शिर्डी नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, यावर विखे यांचाच वरचष्मा असून तालुक्यातील अपवाद वगळता 99 टक्के ग्रामपंचायती, विविध विकास सेवा सहकारी संस्था विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांच्या ताब्यात आहेत.

मतदार संघातील बहुतांश गावात विखे विरोधक नसल्यानं विखे समर्थक दोन गटांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात. मागच्या वेळी भाजपच्या उमेदवाराला अवघी 12 हजार मतं  मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती तर त्याहून वाईट होती.

राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजप प्रवेश केल्यानंतर शिर्डी मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी फक्त नावाला शिल्लक राहिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिर्डी मतदारसंघात पूर्णत: खिळखिळी झाली असून विखेंचं पारड जड आहे.

शिर्डीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू सुरेश थोरात यांना तिकीट देण्यात आलं आहे. विखे यांच्या उमेदवारीला नोटरीच्या मुदतीवरून आव्हान दिल्यानं हे थोरात चर्चेत आले एवढं वगळलं, तर त्यांचा करिश्मा फारसा नाही. बाळासाहेबांच्या यंत्रणेमुळं त्यांना काँग्रेसची काही मतं मिळतील, इतकंच.


Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button