Ahmednagar NewsMaharashtra

मला संधी द्या मी संघर्ष करायला तुमच्या बरोबर राहील

राहुरी ;- वांबोरी चारीचे पाणीचे पाणी टेलपर्यंत पोहोचविण्याचे काम १० वर्षांत आमदार शिवाजीराव कर्डिले यांना जमले नाही. ते काम खासदारांनी करून दाखवले. आता मला संधी द्या, वांबोरी चारीच्या प्रश्नावर मी संघर्ष करायला तुमच्या बरोबर राहील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.

पाथर्डी तालुक्यातील मिरी, रुपेवाडी, केशव शिंगवे, चिंचोडी, शंकरवाडीसह विविध गावांच्या प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी विजय गवळी, बलभीम बनकर, विजय कुटे, फईम शेख, सचिन झाडे, सुभाष गवळी आदी उपस्थित होते.

तनपुरे म्हणाले, विचाराला तिलांजली द्यायची नव्हती, म्हणून मी भाजपमध्ये गेलो नाही. ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या विचाराबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहाण्याचा निर्णय घेतला. देशातील, राज्यातील सरकार लोकशाही संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. आमदारांनी गेल्या १० वर्षात राहुरी तालुक्याचे वाळवंट केल्याने आज राहुरी तालुक्यातील मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. पाणीप्रश्न व तालुक्याची अस्मिता या प्रश्नावर लोक एक झाले आहेत. त्यांच्या खोट्या प्रचाराकडे दुर्लक्ष करा.

माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी त्यांच्या २५ वर्षांच्या कालावधीत पाण्याचे योग्य नियोजन करून तालुका टॅँकरमुक्त केला आहे. मुळा धरणातील तीन टीएमसी पाणी समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे जायकवाडी धरणात जात असताना आता मुळा धरणातील तीन टीएमसी पाणी मुख्यमंर्त्यांच्या महत्वाकांक्षी वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी बीड येथे जाणार आहे. असे झाल्यास वांबोरी चारीचा वॉल्व उघडा पडून भविष्यात वांबोरी चारीला पाणी मिळणार नाही. या प्रकल्पास आमदार कर्डिले विरोध करु शकत नाहीत. यासाठी या प्रकल्पास विरोध करून हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करण्यासाठी विधानसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button