Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingMaharashtraVidhansabha 2019

Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट संगमनेर विधानसभा मतदारसंघ

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेला संगमनेर हा मतदारसंघ. या मतदारसंघातून थोरात 1985 पासून निवडून जात आहेत. त्यांच्याविरोधातील उमेदवाराला रसद पुरविण्याचं काम बाळासाहेब विखे यांच्यापासून आता डाॅ. सुजय विखे यांच्यापर्यंतच्या तीनही पिढयांनी केलं.

बाळासाहेबांच्या विरोधात वेगवेगळे उमेदवार दिले; परंतु संगमनेरमध्ये थोरात यांनी केलेली विकासाची कामं, त्यांचा मतदारसंघात असलेला संपर्क आणि त्यांनी उभं केलेलं संस्थात्मक जाळं यामुळं त्यांच्याविरोधात आतापर्यंत कुणीही टिकू शकलं नाही. मागच्या वेळी चाैरंगी लढत झाली, तेव्हाही थोरात यांच्याविरोधातील सर्वं उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा त्यांची मतं जास्त होती.

लोकसभेच्या निवडणुकीत संगमनेरमध्ये शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांना मताधिक्य मिळालं म्हणजे लगेच आता थोरात यांचा पराभव झाला, असं जे मानत असतील, ते एकतर आभासी जगात वावरत आहेत, असा त्याचा अर्थ होतो. लोकसभेच्या निवडणुकीचे मुद्दे वेगळे होते. विधानसभेचे मुद्दे वेगळे असतात. थोरात यांनी दुस-यांसाठी काम करणं वेगळं आणि त्यांनी स्वतः साठी मतदान मागणं वेगळं. त्यातला फरक लक्षात घ्यायला हवा. बाळासाहेबांची राजकीय सुरुवात जरी बंडखोरीनं झाली असली, तरी त्यानंतर त्यांनी कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी काँग्रेस सोडलेली नाही.

शिवाय त्यांच्यावर कोणताही आरोप नाही. शरद पवार यांच्यांशी व्यक्तिगत चांगले संबंध असूनही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही. लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र असताना संगमनेरच्या जनतेनं लोकसभेला बाळासाहेब विखे यांना आणि विधानसभेला बाळसाहेब थोरात यांना मतदान केलं होतं. विशेष म्हणजे दोघंही वेगवेगळ्या पक्षांत असताना टीव्हीचा चमत्कार झाला होता.

ही राजकीय पार्श्वभूमी असताना राधाकृष्ण विखे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर संगमनेर विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. तिथं त्यांना शालिनी विखे पाटील यांना भाजपच्या तिकिटावर विधानसभेची उमेदवारी द्यायची होती; परंतु गेल्या पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत भाजपला 25 हजार तर शिवसेनेला 44 हजार मतं मिळाली होती. या दोन्ही उमेदवारांपेक्षाही बाळासाहेबांना 40 हजार मतं जास्त होती. शिवसेनेनं या मतदारसंघावरचा दावा कायम ठेवला. त्यामुळं राधाकृष्ण विखे यांचा नाइलाज झाला. त्यांनी तिथं संपर्क कार्यालय सुरू केलं. संपर्क वाढविला; परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला.

विखे कुटुंबीय आणि थोरात कुटुंबीयांनी परस्परांशी संघर्ष टाळला. थोरात यांच्या व्यवस्थापनाखालील संगमनेर कारखाना जिल्ह्यात सर्वाधिक भाव देतो. त्यांच्या राजहंस दूध संघाची ख्याती राज्यभर आहे. इथला शेतकरी समाधानी आहे. गावोगाव थोरात यांचं नेटवर्क आहे. त्या तुलनेत साहेबराव नवले यांचं काहीच नाही. नवले यांनी यापूर्वी जनता दलाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर नवले त्यांच्या व्यवसायात रमले. त्यांनी फारसा संपर्क ठेवला नाही. आता त्यांच्यामागं शिवसेना आणि भाजपचं नेटवर्क आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांचं संगमनेर हे गाव आहे; परंतु भाजपचं कमळ तिथं कधीच फुललं नाही. अर्थात संगमनेर नगरपालिकेत भाजपचे नगरसेवक होते.

आतापर्यंत थोरात-विखे यांच्या सत्ता संतुलनात संगमनेरनं महत्त्वाची भूमिका बजावली. थोरात यांनी राज्य मंत्रिमंडळात जलसंधारण, शिक्षण, कृषी, महसूलसारखी महत्त्वाची खाती भूषवली. त्यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठीही घेतलं जात होतं. त्यांचं पक्षात वेगळं स्थान आहे. संगमनेर तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि अनेक ग्रामपंचायती तसंच स्थानिक संस्थांवर थोरातांचं वर्चस्व आहे. थोरात यांच्या विरोधकांत कधीच एकवाक्यता राहिलेली नाही. त्याचा फायदा थोरातांना सातत्यानं मिळाला. इतर ठिकाणी घराणेशाहीविषयी लोकांच्या मनात तिडीक असते; परंतु संगमनेरमध्ये ती दिसत नाही. त्याचं कारण घराणेशाही असली, तरी थोरात यांची नातेवाइक मंडळी लोकशाही पद्धतीनं निवडून येत असतात. त्यांचं काम चोख असतं. त्यामुळं तर त्यांच्यावर जनता वारंवार विश्वास टाकते.

थोरात यांचे मेहुणे सुधीर तांबे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांची बहीण दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष आहे. त्यांचे भाचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. संगमनेर शहराला निळवंडे धरणातून केलेली पिण्याच्या पाण्याची थेट पाईप लाईन, शहरातील सर्वंच सहकारी संस्थांचा आदर्श आणि स्वच्छ कारभार, कार्यकर्त्यांची मजबूत फळी या बाळासाहेबांसाठी जमेच्या बाजू आहेत. तरीही निळवंडे धरणाच्या कालव्यांची रखडलेली कामं हा त्यांच्यावर टीकेचा विषय आहे. अमृतवाहिनी हॉस्पिटल, मेडिकल-फार्मसी कॉलेज, इंजिनीयरिंग कॉलेज आदींच्या माध्यमातून त्यांच्या अनेक लोकोपयोगी कार्यक्रम चालवले जातात. मतदारांना बांधून ठेवण्यात अमृतवाहिनी उपक्रमाचा वाटाही मोठा असतो. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील एकाच पक्षात असतानादेखील त्यांच्यात अंतर्गत कुरघोडीचं राजकारण सुरू होतं. आता विखे यांनी नवले यांच्यामागं आपली यंत्रणा उभी केली असली, तरी ती थोरात यांना कितपत आव्हान देऊ शकते, याबाबत साशंकता आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button