दहा वर्षात विकासाचा खडासुद्धा टाकला नाही-आ. कोल्हे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोपरगाव : पुणतांबा परिसराचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपल्याला केंद्र व राज्य शासनाकडे हे प्रस्ताव मांडून त्यासाठी निधी मिळवावा लागेल.

कारण पुणतांबा परिसरात यापूर्वी ज्यांच्याकडे दहा वर्षे सत्ता होती त्यांनी विकासाचा साधा खडा सुद्धा टाकलेला नाही, असा आरोप आमदार स्नेहलता कोल्हे यांनी रविवारी पुणतांबा परिसरातील वाकडी व जळगाव येथे प्रचार सभेत माजी आमदार अशोक काळे यांच्यावर केला. अध्यक्षस्थानी महादेव लहारे होते.

आमदार कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या ८९ गावात आपण गेल्या पाच वर्षात विकासाची काही ना काही प्रक्रिया राबविली आहे. केलेल्या कामाची शिदोरी पुन्हा आगामी काळासाठी देवून ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी सर्वश्री गोरक्षनाथ येलम, शिवाजीराव लहारे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, सेनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे, संजय शेळके, भीमराज लहारे, येलबा येलम, रामनाथ वार, संपतराव लहारे, अनिल शेळके यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

विनायकराव देठे व अगस्ती कापसे यांनी यावेळी भाजपत प्रवेश करत आमदार कोल्हेंना साथ देण्याचा निर्णय घेतला.आमदार कोल्हे म्हणाल्या, पुणतांबा परिसरात यापूर्वी ज्यांच्याकडे दहा वर्षे सत्ता होती. त्यांनी विकासाचा साधा खडा सुद्धा टाकलेला नाही.

त्यामुळे हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपल्याला केंद्र व राज्य शासनाकडे हे प्रस्ताव मांडून त्यासाठी निधी मिळवावा लागला. सिंचन पाटपाण्याच्या कामासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे वेळोवेळी सहकार्य घेतले.

‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम या भागात जोरदारपणे राबवून त्यातून उपेक्षित घटकांपर्यंत योजना पोहोचविता आल्या. माजीमंत्री शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष तसेच मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्याने या भागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा मनापासून प्रयत्न केला. त्यात आपल्या सर्वांच्या साथीने यश देखील आले आहे.

पक्षाने मेरीटवर पुन्हा आपल्यालाच कोपरगाव विधानसभेची उमेदवारी करण्याची संधी दिली आहे. महिला बचत गट ही आपली शक्ती असून, त्यातून केलेल्या कामाचे परिमार्जन मतदारांनी करावे आणि आलेल्या संकटात प्रामाणिकपणे दिलेल्या साथीला महत्व देवून विरोधकांच्या गोबेल्स तंत्राच्या प्रचाराला न भुलता आपल्याला साथ द्यावी.

रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याकडे आराखडा तयार असून, प्राधान्याने काम सुरू आहे. विरोधक न केलेल्या कामावर टीका करतात, पण ते तत्कालिन आमदार असूनही त्यांना दुष्काळ, पाण्याचे आवर्तन, जलयुक्त शिवार याबाबतचा अभ्यास नाही याचे दुर्दैव वाटते.

त्यामुळे त्यांना मते मागण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. विधीमंडळ कामकाजात कशाला महत्व आहे. हेच जर त्यांना समजत नसेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेव्हढी थोडीच आहे. असे सांगत त्यांनी पाच वर्षात कोपरगाव मतदारसंघासाठी ३२१ कोटी रुपयांच्या निधीतून केलेल्या कामाची माहिती दिली व विकासाच्या आगामी संकल्पना स्पष्ट केल्या.

Leave a Comment