Maharashtra

ऊस तोडणी मजुराचा मुलगा चीनला !

अहमदनगर ;- लहानपनापासूनच आश्रमशाळेत वाढल्याने तसा त्याचा घरचा पत्ता नाही. नाही म्हणून दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात मातेगाव या गावाजवळील एका तांड्यावर झोपडीवजा घर आहे. हाच काय तो सांगायला पत्ता. आई- वडील दोघेही आपलं बिर्‍हाड पाठीवर घेऊन वर्षातील सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ भटकंती करत ऊसतोड करतात.

ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता ऊसाच्या फडात राब-राब राबणार्‍या या हाताच्या कामातून साखर गोड होते खरी, मात्र या ऊसतोड कामगारांचा संघर्ष कायम चालू असतो. मुळात ज्या पद्धतीने ऊसतोड कामगारांना काम करावे लागते, त्या तुलनेत कष्टाचा मोबदला मिळत नाही. त्यामुळे कारखान्याचा हंगाम संपला तरी ऊसतोड़ कामगार मिळेल तिथे मजुरी करत स्वतःचा उदरनिर्वाह करतात.

जत्रे निमित्त वर्षातून एकदाच आश्रम शाळेतून मुलांना गावी आणणं, हा मागील १५ वर्षापासूनचा अजय जाधवच्या आई- वडीलांचा नित्यक्रम. जणु काही हाच त्यांचा तो दिवाळी -दसरा. अपवाद मागील वर्षीचा. ‘युवान’ संस्थेच्या प्रेरणादायी वातावरणात घडून मोठा मुलगा आकाशला पुणे जिल्ह्यातील अवसरी येथील शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला.

‘युवानने’ शिक्षणाचा खर्च उचलल्यामुळे सर्व सुरळीत सुरू होते. मदतीची जाणीव ठेवत प्रथम व द्वितीय वर्षात आकाश प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाला. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. शिक्षक दिनाच्या दिवशी गुरुवर्यांना वंदन करून सर्व विद्यार्थ्यांनी ‘कॉमन ऑफ’ घेतला. दिवसभर करायचे काय म्हणून एका मित्राने जवळील ओझरच्या अष्टविनायकाला जाऊन येऊ, म्हणून त्याला बाईकवर सोबत घेतले.

ऐरवी कॉलेज परिसराच्या बाहेर न जाणारा आकाश नेमका ‘त्या’ दिवशी गावाबाहेर पडला, तो परत कधीच न येण्यासाठी… एस टी बसने वेगात मागून धड़क दिल्याने तोल जाऊन दोघे मित्र त्याच एस टी बसच्या चाकाखाली आले. इंजिनीरिंग नंतर आय.ए.एस अधिकारी बनणायचे स्वप्न पाहणारा आणि ‘युवान’ विद्यार्थ्यांचा रोल मॉडेल बनू पाहणारा आकाश सगळ्यांवर आभाळ कोसळवून गेला.

आधीच दारिद्रयात दिवस काढत असतांना आकाशरूपी मोठी आशा कुटूंबाला होती परंतू या अनपेक्षित घटनेने त्यांचे कुटूंबिय मानसिकरित्या खूप खचले. त्याचवेळी आकाशचा लहान भाऊ अजय ‘युवान’ मध्ये राहून शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर येथे मेकॅनिकल इंजिनीरिंगची पदविका घेत होता. काही महिन्यापूर्वीच त्याने पदविका पूर्ण केली.

‘युवान’ मार्फत पदवीची संधी असूनही त्याने आई -वडीलांचे कष्ट कमी करण्यासाठी जॉब करण्याचा निर्णय घेतला. युवानच्या मदतीने त्याने काही कंपन्यांच्या मुलाखती दिल्या. सुपा एम.आय.डी.सी.स्थित ‘मीडिया’ या जागतिक चीनी कंपनी संचलित जी.एम.सी.सी. या उपकंपनी द्वारे त्याची या ट्रेनी इंजिनियर म्हणून नुकतीच निवड केली.

कंपनीमार्फत पुढील प्रशिक्षणासाठी तो चीनला गेला आहे. आयुष्यभर पाठीवर ऊसाची मोळी वाहत आणि बैलगाडीने महाराष्ट्र तुडविनाऱ्या ऊस तोड़नी मजूराचा मुलगा आज विमानाने परदेशात गेला, याचा युवानला सार्थ अभिमान आहे. यावर न थांबता आपल्या कमाईतील १०% हिस्सा एका ‘युवान’ विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी देण्याचे त्याने ठरविले आहे. ज्या समाजाने आपल्याला घडविले त्या समाजाचं आपण देणं लागतो. ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजणं, हे ‘युवान’ कार्याचं मोठं फलित आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button