Ahmednagar NewsMaharashtra

पाणी न देणारेच आज पाण्याच्या घोषणा करत आहेत : ना.शिंदे

जामखेड : आजवर तालुक्याला पाणी देण्यास ज्यांनी टाळाटाळ केली तेच आता पाणी देण्याच्या घोषणा करत आहेत. आम्ही मात्र शहर व वाड्यावस्त्या टँकरमुक्त होण्यासाठी पुढील ५० वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून ११७ कोटीची रुपयांची उजनी धरणातून पाणीयोजना मंजूर केली आहे. त्यामुळे आगामी काळात जामखेड शहर नव्हे तर तालुकाच टँकरमुक्त होईल.राज्यातील सहकारी सेवा संस्थेच्या सचिवांना सरकारी सेवेत सहकार विभागात रूजू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून त्यांचा प्रश्न सोडवू. असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.

जामखेडमध्ये आयोजित मेळाव्यात ना.शिंदे बोलत होते. ते म्हणाले, १९९९ साली कुकडीचे हक्काचे पाणी तालुक्याला देण्यासाठी तात्कालिन पाटबंधारे मंत्री एकनाथराव खडसे यांनी एक टीएमसी पाण्याची तरतूद केली होती. परंतु सत्ता बदलानंतर आघाडी सरकारमधील पवारांनी ते देण्याचे टाळले. आज तेच येथे आम्ही पाणी आणणार अशा घोषणा करीत आहेत. मात्र आपण पुढील पाच वर्षांत कृष्णा भीमा स्थिरीकरण खोऱ्याचे पाणी तालुक्यात आणून तालुका सुजलाम सुफलाम करणार आहे. सहकार आणि सरकार एकत्र आल्याने आता तालुक्याचा विकास होणार आहे. विरोधकांनी एकही विकासकामे केली नाहीत. त्यामुळे आता त्यांना पळताभुई थोडी होईल, असे राम शिंदे म्हणाले.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात म्हणाले, पालकमंत्र्यांनी अनेक विकासकामे केली आहेत. आता फक्त तरुणांना नवीन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत.यासाठी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सर्व चेअरमन, व्हा.चेअरमन,संचालक व सचिव तुमच्याबरोबर आहेत. सचिवाचा खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळे आगामी काळात तुम्ही तो सोडवणार अशी आम्हाला खात्री आहे. सचिवांना सहकारी बँकेत कायमस्वरूपी नोकरीसाठी प्रयत्न करावे.बाजार समिती मध्ये कुठेही भ्रष्टाचार झाला नाही आणि भूखंड ही विकला नाही. गरिबांची जाण असलेले ना.प्रा.राम शिंदे हेच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुकडीचे पाणी आणू शकतात. असे राळेभात म्हणाले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button