श्रीरामपूरच्या विकासासाठी आ.भाऊसाहेब कांबळे यांना साथ देणे गरजेचे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीरामपूर :- मतदार संघाचे भवितव्य शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायाशी आहे. त्यावरच लहान मोठे व्यवसाय आणि बाजारपेठ चालते. या सर्व गोष्टींसाठी पाटपाणी हा महत्वाचा प्रश्न असून तो सोडविण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे.

समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे आपले हक्काच्या पाण्यावर गदा आली असल्याने भविष्यात या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी पक्षाचा असावा लागतो.

त्यामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाच्या भवितव्यासाठी आणि विकासासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आ.भाऊसाहेब कांबळे यांना साथ देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.

भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आ. कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेमध्ये श्री. मुरकुटे बोलत होते.

मुरकुटे म्हणाले, सन १९९९ मध्ये केलेली चूक आता भोगावी लागत आहे. सन १९९९ ते २००९ या दहा वर्षात तालुका भकास झाला. तालुक्याच्या हक्काचे पाणी गेले.

शेती उजाड; तर शेतकरी उद्ध्वस्त झाला. पाण्याअभावी केवळ शेतीच नाही, तर दूध व्यवसायालाही फटका बसला. बारमाही शेती जिरायती बनली आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या शेतमजूर व गोरगरीबांचा रोजगार गेला.

पाटपाण्याअभावी अशोक व राहुरी असे दोन्ही साखर कारखाने अडचणीत सापडल्याची भिती आहे. या कामधेनू वाचवायच्या असतील तर महायुतीच्या उमेदवारास साथ द्या.

उमेदवार आ. कांबळे म्हणाले, पावसाळी छत्रीसारखे निवडणुकीच्यावेळी अवतरणारांनी तालुक्याची उठाठेव करु नये. आम्ही येथेच जन्मलो आणि वाढलो. तसेच येथील जनतेशी व सामान्य माणसाशी आमची नाळ जुळलेली आहे. या भागातील प्रत्येक गावाशिवाराचे प्रश्न आपणास माहित आहेत.

यावेळी लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, काशिनाथ गोराणे, अभिषेक खंडागळे, भाऊसाहेब हळनोर, जि.प.सदस्य शरद नवले, भाजपचे बबनराव मुठे, शिवसेनेचे अशोक थोरे, अरुण पाटील, सनी बोरुडे, विठ्ठलराव राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment