हवेत असलेल्या पाचपुतेंना शेलारांनी घाम फोडला!

श्रीगोंदा – श्रीगोंदा मतदार संघात भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी  मोठी ओढाताण सुरू असल्याचे जिल्ह्याने पाहिले होते. या स्पधेत पाचपतेनी नागवडेंना मागे सोडत भाजपाचे तिकीट मिळवले होते.  उमेदवारी मिळवल्यानंतर माजी मंत्री बबनराव पाचपुतेंना अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटत होतं. 

कारण  लोकसभा निवडणुकीतही  या मतदार संघातून खा. डॉ. विखे यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी खा. डॉ. विखेंच्या मध्यस्थीने पारंपारीक विरोधी राजेंद्र नागवडेही प्रचारात सक्रिय झाल्याने पाचपुतेंना आताच आमदार झाल्यासारखं वाटू लागलं होत. 

मात्र, आ. राहुल जगताप यांनी घनश्याम शेलार यांच्यामागे ताकद उभी केल्याने आता चित्र काहीसे बदलत असल्याचे बोलले जात आहे. श्रीगोंद्यात पाचपुते – शेलार ही लढाई तशी फारसी चुरशीची वाटत नव्हती. कारण, येथे पाचपुतेंची मोठी ताकद निर्माण झालेली आहे.  

Loading...

दरम्यानच्या काळात पाचपुतेंना आता विजय दृष्टीपथात दिसू लागला आहे. असे असताना राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी जिल्ह्यात दौरा करताच श्रीगोंद्यातही कार्यकर्ते उत्साही बनले आहेत. त्यामुळे शेलार यांच्या प्रचाराने जोर धरला आहे. त्यात श्रीगोंद्याचे ‘किंग’ असलेले आ. राहुल जगताप हे राष्ट्रवादीचे काम करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. 

त्यातून त्यांनीही पाचपुतेंना पाडण्यासाठी तनमनाने प्रयत्न सुरू केलेले आहेत. अर्थात, याकामी ‘धन’ कमी पडणार असले तरी गेल्यावेळी पाचपुतेंना पाडण्यासाठी हट्ट धरून बसलेल्या अजित पवारांनी ज्याप्रकारे रसद पुरवली तशी यावेळीही शेलारांना ती पुरवावी, अशी जगताप यांची अपेक्षा आहे. 

ती पूर्ण झाली तर निकालाचे चित्रही बदलले असेल, असे मत जाणकार व्यक्त करत आहे. मात्र, सध्या मात्र शेलारांचा  झंझावती प्रचार पाहून पाचपुतेंना घाम फोडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.