…रामाचा रावण झालायं, येत्या २१ ला दहन करण्याची वेळ!

जामखेड – गेल्या दहा वर्षांपासून कर्जत-जामखेडचा विकास खुंटला आहे. आता रोहित पवार यांच्या माध्यमातून आपल्याला नवीन चेहरा मिळाला आहे. येत्या २१ ला राम शिंदे यांना पायउतार करा. 

कारण रामाचा रावण झाला असून त्याचे दहन करण्याची वेळ आली आहे, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जामखेड येथील सभेत लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ बुधवारी बाजारतळावर मुंडे यांची सभा झाली. यावेळी उमेदवार पवार, राजेंद्र फाळके, राजेंद्र गुंड, राजेंद्र कोठारी, मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, शहाजीराजे भोसले, वैभव जामकावळे, प्रदीप टापरे, दादा सरनोबत, सूर्यकांत मोरे, अक्षय शिंदे, सुरेश भोसले, रमेश आजबे, शहाजी राळेभात, चंद्रकांत राळेभात, सुरेश भोसले, सुनील लोंढे, सुनील कोठारी, अमोल गिरमे, प्रशांत राळेभात, गजाजन फुटाणे, जुबेर सय्यद, अमृत महाराज डुचे आदी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, मुख्यमंत्री सांगतात आमच्या काळात भ्रष्टाचार झाला नाही. मी विधानसभेत पुरावे दिले. त्यावर कोणीच बोलत नाही. ते पुरावे खोटे निघाले, तर मला फाशी द्या? शरद पवारांनी महाराष्ट्र जेवढी विमानतळे केली, तेवढी गुजरातमध्ये बसस्थानकेदेखील झाली नाहीत. हे सरकार ईडीची भीती दाखवून शरद पवारांना संपवायला निघाले आहेत. मात्र, आमच्यासारखे लाखो तरुण मावळे आहेत, तोपर्यंत राष्ट्रवादी संपणार नाही.

महाराष्ट्रात परिवर्तन होणार हे आता निश्चित झाले आहे. कारण शिवसेनेने भाजपचा उमेदवार जिथे उभा आहे, त्या ७२ ठिकाणी बंडखोरी केली आहे, तर भाजपने शिवसेनेचे उमेदवार जिथे उभे आहेत त्या ६९ ठिकाणी बंडखोरी केली आहे. मग युती कशी म्हणायची. त्यामुळे आमचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. 

माझ्या दृष्टीने विकास म्हणजे काय तर पाच वर्षांत लोकांचे उत्पन्न दुप्पट करणे होय. बारामतीसारखा विकास रोहित पवार कर्जत-जामखेडचा करतील याची मी ग्वाही देतो, असे मुंडे म्हणाले.