रेशनिंगच्या काळ्याबाजाराचा भांडाफोड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर – शहराच्या तांगे गल्ली येथील स्वस्त धान्य दुकानातील रेशनिंगचा माल इतर गोण्यात पॅकिंग करुन विक्रीसाठी टेम्पोमध्ये भरला जात असताना जन आधार सामाजिक संघटनेचे प्रकाश पोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन रेशनिंग मालाच्या काळ्याबाजाराचा भांडाफोड केला.

रेशन दुकान मालकांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला असता पोटे यांनी यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारींसह जिल्हा पुरवठा विभागाला कळविले. पुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन रेशनिंग मालाचा पंचनामा केला.

रेशनिंगचा कालाबाजार करणार्‍या दुकान मालकावर कारवाई करुन त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. जुन्या कोर्टाच्या मागील बाजूस असलेल्या तांगे गल्ली येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 1 मधून रेशनिंगचे धान्य दुसर्‍या गोण्यात पॅकिंग करुन विक्रीसाठी नेले जात असल्याची माहिती पोटे यांना मिळाली.

ते रेशनिंगच्या दुकानासमोर आले असता त्यांनी यासंदर्भात विचारणा केली असता माल टेम्पोत भरणार्‍या व्यक्तींनी पळ काढला. तर रेशन दुकान मालकाने दुकान बंद करुन घेतले. त्या दुकान चालकास विचारले असता त्यांनी एवढ्या वेळेस माफ करा.

यापुढे रेशनिंग मालाचा काळाबजार होणार नसल्याचे उत्तर दिल्याचे पोटे यांनी सांगितले आहे. पोटे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना फोन करुन सदर माहिती दिली असता, पुरवठा विभागाचे अधिकारी गवळी सदर ठिकाणी दाखल झाले.

त्यांनी देखील सदर दुकान चालकास एवढ्या वेळेस सोडून देण्याची विनंती केल्याने पोटे यांनी पुरवठा अधिकारी यांना फोन करुन बोलावून घेतले. त्यांनी सदर रेशन दुकानाची व त्यामध्ये असलेल्या मालाची तपासणी करुन पंचनामा केला.

गोरगरीबांच्या तोंडातील जेवणाचा घास पळवून त्यातून पैसे कमविणार्‍या रेशनिंग दुकानरासह त्यांना अभय देणार्‍या व त्यांना एवढ्या वेळेस सोडून द्याची मागणी करणार्‍या अधिकारींवर कारवाई करुन सदर दुकानाचा रेशनिंगचा परवाना रद्द करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Comment