कोथिंबीरीच्या एका जुडीला कोंबडीच्या दरापेक्षा जास्त भाव !

नाशिक ;- बाजार समितीत कोथिंबीरीला तब्बल २८ हजार रुपये शेकडा दर मिळाला. एरवी कोथिंबीर दर न मिळाल्यामुळे रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते; पण आज मात्र याच कोथिंबीरीला कोंबडीचा दर मिळाला आहे.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात परतीच्या पावसाचे झोडपणे सुरूच आहे. लाखो हेक्टरवरील पिकांना त्याचा फटका बसला असून, दिवसागणिक त्यात भर पडत असल्याने शेतकरी हबकला आहे. पावसामुळे शेतातील माल पूर्णपणे खराब झाल्याने बाजार समितीत भाज्यांची आवक घटली आहे.

त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वधारले असून, कोथिंबीरीच्या एका जुडीला तब्बल २८० रुपये म्हणजेच कोंबडीच्या दरापेक्षा अधिकचा दर मिळाला आहे.

AMC Advt

मेथी, कांदापात, शेपू, पालक यांसारख्या पालेभाज्याही ३० ते ४० रुपये जुडी विकल्या जात आहेत. कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात अशा पालेभाज्यांचे विशेष करून भाव वाढल्याची परिस्थिती पाहायला मिळते. पालेभाज्या आणि भाजीपाल्यांची आवक घटल्याने काही दिवसांपासून हे भाव वाढत आहेत.