कांदा सडला..आणि शेतकरी रडला,कांदा उत्पादकांनी पावसापुढे टेकले हात!

संगमनेर : कांदा सडल्याने संगमनेर तालुक्यातील पठार भागातील शेतकरी सध्या रडकुंडीला आले आहेत. डोळयादेखत हातातोंडाशी आलेल्या सेंद्री लाल कांद्याचे पीक परतीच्या पावसामुळे शेतामध्ये पूर्णपणे सडून गेले आहे.

 त्यामुळे आता आम्ही शेतकऱ्यांनी कस जगायचं? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.संगमनेर तालुक्याच्या पठार भागाकडे नेहमीच दुष्काळी भाग म्हणून पाहिले जात आहे. 
वर्षानुवर्षांपासून येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांची शेती ही पावसावरच अवलंबून आहे.

त्यामुळे उन्हाळा म्हटलं की, या भागातील शेतकऱ्यांना रोजंदारीसाठी बाहेरगावी जावे लागत आहे. अशी दयनीय अवस्था या पठार भागाची आहे. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळ , शेतीमालाला बाजारभाव नाही. 

AMC Advt

त्यामुळे शेतकरी पुर्णपणे हतबल झाला आहे. यावर्षी तरी सेंद्री लाल कांद्याचे चांगले पैसे होतील म्हणून नांदूर खंदरमाळ, मोेरेवाडी, बावपठार, माळेगाव पठार, धादवडवाडी, पेमरेवाडी, डोळासणे, कर्जुले पठार, सारोळे पठार, वरुडी पठार, पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी, मोधळवाडी, पोखरी बाळेश्वर, तळेवाडी, सावरगाव घुले, ढोलवाडी, जवळे बाळेश्वर आदी गावांमधील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी लाल कांद्यांची पेर केली. तर कोणी लागवड केली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नांदूर भागातील शेतकऱ्यांवर दुबार कांद्याची पेरणी करण्याची वेळ आली.

कसाबसा कांदा उतरुन आला. . त्यानंतर परतीच्या पावसाला सुरुवात झाली. जवळपास महिन्याभरापासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला संपूर्ण कांदा , बाजरी, सोयाबीन, भुईमूग ही पीक शेतकऱ्यांच्या डोळयादेखत शेतामध्येच सडून गेली आहेत. हताश झालेल्या बळीराजाला डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे.

 अवघ्या तीन महिन्याच्या पावसाळयात या भागातील शेतकरी कांदा पीक घेतो. त्यासाठी प्रचंड खर्च करून कांदा पिक घेत असतो. मात्र सतत पडलेल्या एक महिन्याच्या परतीच्या पावसाने हा कांदा अक्षरश: शेतामध्ये भिजून पडला. त्यातच पाऊस उघडण्याचे काय नाव घेईना. सततच्या पावसामुळे शेतामध्ये कांद्याची दुर्गंधी पसरली आहे. 

झालेला खर्चही वसूल होणार नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. कांद्याला चांगले बाजारभाव असल्याने त्यामुळे शेतकऱ्यांना वाटत होते की, यावर्षी कांद्याचे चांगले पैसे होतील. त्यामुळे शेतकरी आनंदी होता. पण परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास पुर्णपणे हिरावून नेला आहे. 

जगावं की मरावं अशी परिस्थिती शेतकऱ्यांपुढे निर्माण झाली आहे. सध्या तरी कांदा सडला..आणि शेतकरी रडला असे चित्र पठार भागावर पहावयास मिळत आहे.