Ahmednagar NewsAhmednagar NorthBreaking

आता कोपरगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा

कोपरगाव : गेल्या काही वर्षांच्या दुष्काळानंतर सुरूवातीपासून आवश्यक वेळी पडलेल्या पावसामुळे यावेळी खरीपाचे पिके चांगली येणार, या अपेक्षेत असतानाच लांबलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले.

मिळणारे उत्पन्न तर गेलेच परंतु, रब्बी पिकांच्या खर्चासाठीच्या तरतुदीचीही वाताहत झाली. अशा परिस्थितीत सरकार व सर्व समाजघटकांनी या लाखोंच्या पोशिंद्यांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे आहे.

सरकारने आता कोपरगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी वेळप्रसंगी निकषांमध्ये शिथिलता आणावी, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इ्स्टिटट्यूट्सचे विश्वस्त व युवा नेते सुमित कोल्हे यांनी केले.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे उपस्थित सुमित कोल्हे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे, कृषी अधिकारी श्रीमती एस. जी. वाबळे, तलाठी एन. आर. जावळे, ग्रामसेवक एफ. एन. तडवी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांच्या समवेत तालुक्यातील ब्राम्हणगाव शिवारात परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

या दरम्यान कोल्हे यांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या. यावेळी ब्राम्हणगावचे पोलीस पाटील रवींद्र बनकर, सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक निवृत्ती बनकर, प्रकाश जाधव, चांगदेव आहेर, संपत अनर्थे, संजय वाकचैरे, अनुराग येवले, शरद अनर्थे, भास्कर सोनवणे व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.

शासकीय पथकाबरोबर चर्चा करताना कोल्हे म्हणाले, शेतकऱ्यांचे वीज पंप मागील सहा महिन्यांपासून बंद आहेत, तेव्हा सहा महिन्यांचे वीज बीलही माफ होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांकडे असणारे पशुधन वेगवेगळ्या आजारांनी आजारी पडत आहेत.

तेव्हा पशुसंवर्धन विभागाने तातडीने आदेश काढुन एफ.एम.डी. व लाळ्या खुरकतीचे मोफत लसीकरण करावे. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे मिळावे तसेच मनरेगा अंतर्गत शेतातील रस्ते व बांध दुरूस्त करून मिळावे.

दिवाळीच्या दुसऱ्याच दिवसापासून तहसीलदार व त्यांच्या यंत्रणेने पंचनामे करण्यास सुरूवात केल्याबद्दल सुमित कोल्हे यांनी सरकारी यंत्रणेप्रती आभार व्यक्त केले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button