बळीराजापुढे दुसरे नवे संकट, कापसाचे भाव ५०० रुपयांनी घसरले

राहुरी –

अचानक बाजारभाव ढासळल्याने पावसाने आधीच घायाळ झालेल्या राहुरीच्या शेतकऱ्यांपुढे दुसरे नवे संकट उभे राहिले आहे. उसाला पर्याय म्हणून राहुरी तालुक्यात कपाशीचे क्षेत्र वाढले आहे. 

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे कपाशीच्या पिकाची वाताहत झाली. पहिली वेचणी झालेल्या कपाशीला मागील आठवड्यात ५ हजार १०० ते ५ हजार २०० रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला होता. 

AMC Advt

दरम्यान, शनिवारी कापसाचे बाजारभाव क्विंटल मागे ५०० रुपयांनी कमी झाले आहेत. शनिवारी राहुरीतील व्यापाऱ्यांनी ४ हजार ५०० ते ४ हजार ६०० रुपये क्विंटल या बाजारभावाने सुपर कापसाची खरेदी केली. कापसाचे खरेदी केंद्र म्हणून गुजरातची संपूर्ण देशभरात ओळख आहे. 

मात्र, पावसामुळे गुजरात येथील जिनिंग मिल बंद असल्याचे कारण सांगून राहुरीतील व्यापाऱ्याकडून गेल्या तीन दिवसांपासून कापसाची खरेदी थांबवण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी कापूस खरेदीला सुरुवात झाली असली, तरी एक क्विंटलमागे ५०० रुपये बाजारभाव कमी झाले आहेत. 

ओला कापूस तसेच कापूस गरम झाल्याने बाजारभावात घट झाल्याचे खरेदीदार व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. राहुरी शहरात कापूस खरेदीदार व्यापाऱ्यांची संख्या डझनभर, तर ग्रामीण भागात १०० च्या पुढे कापूस खरेदीदार असून एकट्या राहुरी शहरात दैनंदिन २०० टन कापसाची खरेदी केली जात आहे.