15 जणांच्या जमावाची ५ जणांना कुऱ्­हाडीने जबर मारहाण

अहमदनगर : नगर तालुक्यातील जेऊर (बा.) येथे रस्त्याच्या कारणावरून दोन गटामध्ये वाद झाले. या वादातून पंधरा जणांच्या जमावाने कुऱ्हाड, लोखंडी दांडा, दगडाचा वापर करून ५ जणांना जबर मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तवले व मगर या दोन कुटुंबात रस्त्यावरून वाद असून याच कारणावरुन शुक्रवारी (दि.८) रात्री आठच्या सुमारास अशोक बाळासाहेब मगर व बाळासाहेब भगवंत मगर (दोघे रा. जेऊर) हे इतर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याला घेऊन तवले वस्तीवर गेले.

 अशोक मगर याने श्रीकांत सुरेश तवले (वय २८, रा.तवले वस्ती, जेऊर ता. नगर) यास डोक्यात कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केले. तसेच तवले कुटुंबातील किरण सुरेश तवले, सविता दिलीप तवले, चंद्रकला सुरेश तवले व सुरेश तवले (सर्व रा बायजाबाई जेऊर ता. नगर) यांना मारहाण करून जखमी केले. 

तसेच तवले यांच्या घरात लॉकरमध्ये असलेले ३० ते ४० हजार रूपयाची रक्कम व ४ तोळे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहे. 

याप्रकरणी श्रीकांत तवले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अशोक मगर, बाळासाहेब मगर व इतर दहा ते पंधरा अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. फौजदार पालवे हे करत आहेत.