BreakingMaharashtra

११ कांदा व्यापाऱ्यांवर धाडी!

नाशिक : कांद्याची होणारी साठेबाजी. शंभरी पार करणारे दर आणि निर्माण होणारी संभाव्य कृत्रिम टंचाई या बाबी तपासण्यासाठी सोमवारी (दि. ११) आयकर विभागाच्या पथकाने जिल्ह्यातील ३ बाजार समित्यांमधील ११ कांदा व्यापाऱ्यांच्या चाळींवर धाडी टाकत त्याचे व्यवहार तपासले.

यात लासगाव येथील ४, येवल्यातील ३ आणि पिंपळगावमधील ४ व्यापाऱ्यांचा समावेश आसल्याची चर्चा आहे. या छापासत्राने व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून व्यापाऱ्यांनी या कारवाईच्या निषेधार्थ काही काळ लिलाव बंद ठेवले होते. दरम्यान ही कारवाई साठेमारी करून कांद्याचे दर वाढवणाऱ्या व्यापाऱ्यांना वेसण घालण्यासाठी केल्याची माहिती आहे.

परतीच्या पावसाने राज्याला एकीकडे झोडपून काढल्याने नाशिक, पुणे आणि नगर जिल्ह्यांतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा शेतमाल पूर्णपणे शेतात सडला, तर साठवणूक करून चाळीत ठेवलेला कांदाही या पावसाच्या तडाख्यात सापडल्याने चाळीच्या चाळी पाण्यात गेल्या.

यामुळे कांद्याची आवक निम्म्याहून कमी झाली आणि परिणामी मुंबई एपीएमसीत घाऊक कांदा बाजारात कांद्याने शंभरी ओलांडली. त्यामुळे ग्राहकांकडून केंद्र सरकारविरोधात रोष निर्माण होऊ लागल्याने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आणि तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभरात कांद्याचा साठा संपुष्टात आला आहे त्यामुळे देशांतर्गत कांद्याच्या दराला लगाम घालण्यासाठी आता कांदा साठवणुकीवरही नियंत्रयण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बाजार समितीकडून कांदा आवक, विक्री आणि शिल्लक साठा याबाबतचा दैनंदिन अहवाल मागविण्यात येऊन कांदा साठवणुकीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, कांद्याचे आर्थिक व्यवहार तसेच कांदा साठवणुकीच्या शक्यतेने लासलगाव येथील ४, येवल्यातील ३ आणि पिंपळगावमधील ४ अशा ११ व्यापाऱ्यांची आयकर विभागामार्फत तपासणी करण्यात आली असल्याची चर्चा आहे. केंद्र सरकार हेतुपुरस्सर व्यापाऱ्यांना लक्ष्य करीत आहे.

सरकारच्या या कृतीचा निषेध करीत नाइलाजास्तव काही वेळ लिलाव बंद ठेवावे लागले. आयकर विभागाच्या कांदा व्यापाऱ्यांवर अशा धाडी पडत असतील, तर कांदा कसा खरेदी करायचा व तो साठवायचा कसा व कोठे, असा प्रश्न एका कांदा व्यापाऱ्याने उपस्थित केला आहे.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close