या कारणासाठी झाले उद्योजक हुंडेकरी यांचे अपहरण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : येथील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांच्या अपहरणप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.१९) जालना जिल्ह्यातील परतूर येथून दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून, नगर येथील सराईत गुन्हेगार अजहर मंजूर शेख हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणातील शेखसह आणखी एका आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी (दि.१८) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक अब्दुल करीम सय्यद (वय ७०, रा. घर नं. ६९६१, एसटी कॉलनीसमोर, फकीर गल्ली, नगर) यांचे अज्ञात दोन इसमांनी बळजबरीने कारमध्ये बसवून साथीदारांच्या मदतीने अपहरण केले होते.

या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. यासंदर्भात सय्यद अफरोज अब्दुल करीम (वय ४३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिलीप पवार यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्यातबाबत सूचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या एकूण ३ टीम सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत होत्या. मात्र सोमवारी दुपारी अपहरणकर्त्यांनी हुंडेकरी यांना जालन्याजवळ सोडून दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हुंडेकरी यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात आणले व घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेऊन तपास यंत्रणा कार्यान्वित केली. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोनि.

पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की हा गुन्हा नगर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार अजहर मंजूर शेख याने त्याचे परतूर (जि. जालना) येथील साथीदारांसह केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार परतूर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लढ्ढा कॉलनीत मंगळवारी पहाटेच्या सुमारास सापळा रचून मुख्य आरोपी अजहर मंजूर शेख हा राहत असलेल्या घरावर छापा टाकत तेथून वैभव विष्णू सातोनकर (वय १९, रा. सातोनकर गल्ली, परतूर, जि. जालना) व निहाल ऊर्फ बाबा मुशरफ शेख (वय २०, रा.लढ्ढा कॉलनी, परतूर, जि.जालना) यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पथकाने त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता या गुन्ह्याबाबत दोघांनी कबुली देत अजहर मंजूर शेख (रा. फकीर गल्ली, नगर) व फतेह सिद्धीक अहमद अन्सारी (रा. मलंगशहा मोहल्ला, परतूर जि. जालना) यांच्या मदतीने व अजहर शेख याच्या सांगण्यावरून हे अपहरण केले असल्याची कबुली दिली.

पथकाने उर्वरित दोन आरोपींबाबतविचारणा केली असता ते दोघे रेल्वे स्टेशन परिसरात चहा पिण्यासाठी गेले असल्याबाबत सांगितले. पोलिसांनी सातोनकर व शेख यांना ताब्यात घेतले. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अजहर शेख व त्याचा साथीदार अन्सारी हे पोलीस आल्याची चाहूल लागल्याने रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण करण्यासाठी वापरलेले चारचाकी वाहन (क्र. एम.एच. २० ई.जे ३८७९) सोडून पसार झाले.

सदर वाहन पथकाने ताब्यात घेऊन परतूर पोलीस ठाण्यात जमा केले आहे. या प्रकरणातील ताब्यात घेतलेल्या आरोपींना काल दुपारी नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले. यातील बाबा शेख याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत सखोल चौकशी पोलिसांनी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा अजहर शेख यास २५ लाख रुपयांची आवश्यकता असल्याने त्याच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे सांगून सदरची रक्कम ही उद्योजक करीमभाई यांना सोडल्यानंतर देण्याचे ठरले होते, असे सांगितले.

Leave a Comment