माजी खासदार दादा पाटील शेळके अनंतात विलीन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर  – ज्येष्ठ नेते व माजी खासदार मारुती देवराम तथा दादा पाटील शेळके ( वय ७९ ) यांचे शुक्रवारी आजाराने निधन झाले . त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी खारेकर्जुने ( ता . नगर ) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 यावेळी राजकीय, सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दादा पाटील शेळके यांच्या मागे पत्नी, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक असलेले पुत्र रावसाहेब व तीन मुली, असा परिवार आहे. रक्तातील साखर वाढल्याने शेळके यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर काही दिवस त्यांच्यावर पुण्यातही उपचार करण्यात आले . दोन दिवसांपूर्वीच त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले होते. औषधोपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
दादा पाटील शेळके हे चार वेळा आमदार व दोनदा खासदार होते . त्यांची साधी राहणी जिल्ह्यातच नव्हे , तर राज्यात कौतुकाचा विषय होता . वयाच्या २१व्या वर्षी दादा पाटलांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. ते १९६२ पासून १९७८ पर्यंत सलग जिल्हा परिषद सदस्य झाले.
नगर तालुका पंचायत समितीचे सभापती व उपसभापती ही पदेही त्यांनी भूषविली . सन १९७८ पासून १९९४ पर्यंत ते विधानसभेवर सलग निवडून गेले. पुढे १९९४ व १९९६ अशा दोन वेळा ते खासदारही झाले. दादा पाटलांनी नगर तालुक्यातील वाळकी येथे सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली.
दादा पाटील शेळके यांनी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती उपसभापती, सभापती, जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष, रोजगार हमी योजना समिती सदस्य , नगर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष, नगर तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष, रयतचे उत्तर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य, नगर तालुका सहकारी साखर कारखाना, अध्यक्ष या पदावर काम केले.
तसेच खारेकर्जुने विविध सहकारी संस्था, लोकहितवादी शिक्षण संस्था, नगर तालुका सहकारी साखर कारखाना, नगर तालुका सहकारी दूध संघ, नगर तालुका सहकारी दूधउत्पादक पतसंस्था, सीना वाहतूक सहकारी संस्था या संस्थांची शेळके यांनी स्थापना केली.

Leave a Comment