राज्याला आता स्थिर सरकार मिळणार -कोल्हे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
कोपरगाव : भारतीय जनता पक्षाचे पहिल्यापासून राज्याला स्थिर सरकार देण्याचे वचन दिलेले होते. त्याप्रमाणे येथील मतदारांनी भाजपा-सेना महायुतीला कौलही दिला होता. 
मात्र गेले महिनाभर मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या नाट्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारला पाठींबा देवुन शेतकरी हितासाठी जो निर्णय घेतला त्यामुळे आता स्थिर सरकार मिळणार आहे,असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.

 तसेच चालू वर्षीच्या पर्जन्यमानामुळे आगामी दोन-तीन वर्षे साखर कारखानदारीसाठी सुवर्णकाळ राहणार असल्याचेही ते म्हणाले.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ५७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, माजी आ.स्नेहलता कोल्हे, संचालक अरूणराव येवले, सौ.कांताताई येवले, सर्व आजी-माजी संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या हस्ते शनिवारी झाला.

 त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी उपाध्यक्ष संजय होन, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, कार्मिक अधिकारी प्रकाश चांदगुडे आदिंनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यकारी संचालक जिवाजीराव मोहिते यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी भाजपाचे रविंद्र बोरावके, शहराध्यक्ष कैलास खैरे, गणेश कारखान्याचे शिवाजीराव लहारे, विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, चालु वर्षी साखर कारखानदारी चालविणे अवघड आहे. संजीवनी ३ लाख टन उसाचे गाळप करेल. केंद्र व राज्य शासनाने इथेनॉल संदर्भात काही धोरणे घेतली. राज्यातील ९२ कारखान्यांनी एफआरपी देखील देलेली नाही. शेतकरी सभासदाला उस दर पाहिजे आहे. जागतिक पातळीवर साखरेचे दर पडलेले आहेत. दुष्काळ व नापिकीचा फटका चालु गळीत हंगामाला बसणार आहे.
 त्यातुन उपपदार्थ निर्मीतीही अडचणीत येणार आहे. माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली होणारे तोटे भरून काढू. कोल्हे कारखाना अन्य कारखान्याच्या बरोबरीने राहुन उस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना सहकार्य करेल,असेही ते शेवटी म्हणाले. माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी नुतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले.
 त्या म्हणाल्या आमदार असताना कोपरगाव विधानसभा मतदार संघात विविध विकास कामांसाठी भरीव निधी देत बहिण-भावाचे नाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपले. त्यांनी कोपरगावच्या सभेत समुद्राला वाहुन जाणारे पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळवून नगर-नाशिक विरूध्द मराठवाडा असा पाण्याचा प्रादेशिक वाद कायमस्वरूपी मिटविणार असल्याचे सुतोवाच केले होते.
 या शासनाकडुन हा प्रश्न निश्चित मार्गी लागेल. आपल्या कारकिर्दीत मंजुर झालेली कामे यापुढच्या काळातही मार्गी लागतील. वंचित घटकांसाठीही निधी आणू. संजीवनी उद्योग समुह व मतदार संघाच्या प्रत्येक अडचणीत आपल्याकडुन जेवढी मदत अपेक्षीत आहे, ती आपण देवु. विधानसभा निवडणुकीत आपल्या पराभवासाठी अनेकजण एकवटले होते.
 मात्र असंख्य कार्यकर्त्यांसह विविध संघटना महायुतीच्या सर्व मित्रपक्षांनी आपल्याला सहकार्य केले. त्यांची आपण ऋणी राहुन यापुढेही कार्यरत राहू,असेही त्या म्हणाल्या. संचालक शिवाजीराव वक्ते यांनी आभार मानले.

Leave a Comment