मोदी सरकारच्या हाती राज्यघटनेची मूल्ये सुरक्षित नाहीत !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे राज्यघटना सर्वोच्च असल्याचे सांगत आहेत; परंतु त्याच वेळी दुसरीकडे महाराष्ट्रात जे काही चालले आहे, यावरून या सरकारच्या हाती लोकशाही, राज्यघटना सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होते, असा घणाघात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मंगळवारी संविधान दिनाच्या औचित्याने संसद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर मोदी सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली.

या वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक सुरू होती. या बैठकीत मोदी राज्यघटनेचे महत्त्व विशद करत होते. याबाबत पत्रकारांनी मनमोहन सिंग यांना विचारले असता त्यांनी मोदी सरकार वारंवार राज्यघटनेची पायमल्ली करत असल्याने या सरकारकडून राज्यघटनेप्रती दाखविण्यात येणारा आदर फसवा असल्याचा दावा केला.

केंद्र सरकारने ज्याप्रमाणे महाराष्ट्राबाबत निर्णय घेतले. यावरून हे स्पष्ट होते की, या सरकारच्या हाती राज्यघटनेची मूल्ये सुरक्षित नाहीत, असे मनमोहन सिंग म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा आदर करून त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

संविधान दिनानिमित्त संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना मोदींनी राज्यघटना ही आमच्यासाठी पवित्र पुस्तक असल्याचे म्हटले होते.

Leave a Comment