किरकोळ बाजारात कांदा शंभरीपार !

सुपा : अवकाळी पावसाचा फटका नव्या कांद्याला बसला आहे. बाजारात दाखल होत असलेला कांदा ओला असला तरी त्याला स्थानिक परिसरासून मागणी आहे. जुन्या कांद्याला परराज्यातून मागणी वाढली आहे. मात्र, त्याचा साठा संपत आल्याने कांद्याच्या भावात वाढ झाली असल्याचे कांदा व्यापारी सांगतात.

पावसामुळे नव्या कांद्याचे झालेले नुकसान तसेच साठवणुकीतील जुना कांदा संपत आल्याने घाऊक बाजारात जुन्या कांद्याचे दर ८० ते ९० रुपये किलो पर्यंत पोहचले आहेत. तर किरकोळ बाजारात कांदा १०० रुपये किलो दराने विकला जात आहे.

यामुळे कांदा खरेदी करणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. तसेच नवीन कांद्याची आवक सुरू झाली असून, घाऊक बाजारात नवीन कांद्यास ३० ते ६५ रुपये भाव मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये कांद्याची आवक घटली आहे.

AMC Advt

यंदा परतीचा पाऊस लांबल्याने त्याचा फटका कांद्याच्या नव्या उत्पादनाला मोठया प्रमाणात बसला आहे. जुना व चांगल्या दर्जाचा कांदा केवळ महाराष्ट्रातच उपलब्ध आहे.

त्यामुळे त्यास कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ व तामिळनाडू या राज्यांतून मोठया प्रमाणात मागणी वाढल्याने कांद्याच्या दरामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. जुन्या कांद्याचा साठा मागणीच्या तुलनेत कमी असल्याने ही दरवाढ झाली आहे.

अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून, आवक घटली आहे. भाव वढल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळयांत कांद्याने पाणी आणले आहे.